नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. बरेच नेते एकमेकांसारखे वागतात, बोलतात. राणे त्यात मोडत नाहीत. ते कोणासारखं वागू शकत नाहीत आणि कोणाला त्यांच्यासारखं वागणं परवडूच शकत नाही. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे निर्णय यातून बरेचदा त्यांचं राजकीय नुकसान झालं पण आजवर त्यांनी जे काही मिळवलं ते याच वेगळ्या शैलीमुळे, हेही खरं! त्यांनी काँग्रेस सोडली तेव्हा लोक म्हणाले, राणे संपले ! मात्र आता देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काल दमदार रि-एन्ट्री केली. राणेंना भाजपमध्ये घेताना दहा वेळा विचार झाला होता. ते ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत, कधी काय बोलतील याचा नेम नाही इथपासून तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या बोलण्याचा एखाद्या वेळी पक्षालाच त्रास होईल, अशी प्रतिक्रिया होती. पण संघाच्या संमतीनंतर राणेंच्या हातात कमळ दिलं गेलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना बराच खटाटोप करावा लागला होता.

शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणं यातच भाजपमध्ये आपलं मूल्य आहे हे ओळखून राणे व त्यांची मुलं बोलत राहिली. शिवसेनेवर तुटून पडण्याचं कुठलंही कारण असलं की राणेच कामाचे आहेत अशी भाजपची खात्री होत गेली. राणे-शिवसेना सतत एकमेकांना भिडत असतात. यापुढील काळात हा संघर्ष अधिक तीव्र होत जाईल. मराठा समाजाचं दबंग नेतृत्व भाजपकडे नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा आहेत पण ते मवाळ पक्षाचे ! विखे पाटील, मोहिते पाटील, निंबाळकर, भोसलेंची नवीन पिढी भाजपसोबत आहे मात्र त्यातील कुणाचंही नेतृत्व राज्यव्यापी नाही. अशावेळी ही उणीव राणे भरून काढू शकतात. ते तळकोकणातले कुणबी-मराठा आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाजावर ते कितपत प्रभाव पाडू शकतील हा प्रश्न असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेला अंगावर घेण्याची हिंमत त्यांच्यात आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला

भाजपमधील सध्याच्या मराठा नेत्यांपेक्षा ते अधिक प्रभावी वाटतात. राज्यात मंत्री असताना त्यांना प्रशासनाची उत्तम जाण आलेली होती. त्याचा फायदा दिल्लीत होईल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाण्यासह एमएमआरमधील महापालिका निवडणुका जवळ आहेत. ही बाब समोर ठेवूनच राणे आणि या भागात संख्येनं मोठ्या असलेल्या आगरी-कोळी समाजाचे कपिल पाटील यांना मंत्रिपद दिलं गेलं. मुंबईतील चाकरमाने कोकणात आपल्या गावी मनिऑर्डर पाठवतात अन् त्यावर तिकडची इकॉनॉमी चालते हे पूर्वापार सूत्र आहे. मुंबई आणि कोकण या दोन्हींमध्ये कनेक्ट असलेला अन् शिवसेनेला भिडणारा नेता म्हणून राणेंना मंत्री केलं गेलं. पक्ष व नेतृत्वावर हल्ले होताना शिवसैनिक अधिक त्वेषाने एकत्र येतात असा अनुभव आहे. त्यामुळे राणेंचा उपयोग योग्य ठिकाणी करवून घेण्याचं भान भाजपला ठेवावं लागेल. मुंबई महापालिका समोर ठेवूनच वादग्रस्त कृपाशंकर सिंह यांना भाजपनं कमलपुष्पानं गंगाजल शिंपडून पवित्र करून घेतलं.

अधिक वाचा  हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती पारा ४१ अंशांवर, उष्णतेच्या झळा किती दिवस राहणार?

प्रकाश जावडेकर यांना मोदींनी वगळल्याचं मात्र अनेकांना आश्चर्य वाटलं. ती ब्रेकिंग अन् शॉकिंग न्यूज होती. असं का झालं असावं?- जे दिसतं ते असं आहे की महाराष्ट्रात ‘कास्ट बॅलन्स’ साधायचा होता. त्यात नितीन गडकरींना धक्का लावणं शक्य नव्हतं. त्या मानानं जावडेकर यांना हटवणं अगदीच सोपं होतं. एकतर ते लोकनेते नाहीत. त्यांना काढल्यानं रोषाच्या तीव्र, मध्यम वा हलक्यादेखील प्रतिक्रिया उमटतील अशी शक्यता नव्हती. ” जावडेकरांना का काढलं? ” असं विचारणारे लोक आहेत आणि ” ते इतकी वर्षे मंत्री कसे काय राहिले? ” असा प्रश्न पडलेलेही आहेत. पक्ष, नेतृत्वनिष्ठा, चारित्र्य या बाबी तुम्हाला मानाचं पान देत असतात. त्यानुसार जावडेकरांना ते इतकी वर्षे मिळालं पण त्याचवेळी तुमच्या मर्यादादेखील टिपल्या जात असतात. आता त्यांची मंत्री म्हणून उपयुक्तता नाही किंवा त्यांना पर्याय उपलब्ध आहेत असं वाटल्यानंतर नेतृत्वानं त्यांना बाजूला केलं असावं. काही तारे परप्रकाशित असतात. त्यांच्यात स्वत:ची प्रतिभा नसते असं नाही पण ज्यांच्या प्रकाशात ते जगतात तो मूळ स्त्रोतच त्यांचं अस्तित्व ठरवत असतो.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चेला एकदाचा पूर्णविराम मिळाला. मात्र, त्यांच्या पुढाकारानं भाजपमध्ये गेलेले राणे, कपिल पाटील व भारती पवार हे मंत्री झाले. भाजपनं ओबीसी कार्ड खेळलं. डॉ. भागवत कराड, कपिल पाटील ओबीसी आहेत. डॉ. भारती पवार आदिवासी आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर निलंबित झालेल्या १२ आमदारांचा मुद्दा घेत भाजप पुन्हा एकदा आपल्या परंपरागत व्होट बँकेला गोंजारू पाहत असताना दोन ओबीसी मंत्री दिले गेले हे फडणवीस यांच्या पुढच्या राजकारणासाठी पूरक ठरणार आहे. दोन दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनातील घटनाक्रम पाहता भाजप-शिवसेनेचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. माणसाची सावली संध्याकाळच्या वेळी त्याच्या उंचीपेक्षा बरीच लांब पडते. तसे हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता लांब लांब होत चालली असताना नव्या दमाच्या केंद्रीय मंत्र्यांची टीम फडणवीसांच्या मदतीला पाठवून मोदी-अमित शहा यांनी प्रदेश भाजपला ‘एकला चलो रे’चा संदेश तर दिलेला नाही ना?