मुंबई: विधानसभेची २०१९ मध्ये निवडणूक झाली आणि राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटली. शिवसेनेला हवे असलेले अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद भाजपने न दिल्याने दोन पक्षांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांसोबत जावून महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या साऱ्या घटना महाराष्ट्रातील प्रत्येकाला चांगल्याच लक्षात आहेत. या दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री मान्य करा असा एक सल्ला देण्यात आला होता. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की मी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाबाबत एक सल्ला दिला होता. त्यांनी सल्ला ऐकला असता तर ते आता मुख्यमंत्री असते. याबाबत, फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?

आठवलेंचा सल्ला अन् फडणवीसांचे उत्तर…

भाजप आणि शिवसेना यांच्यात फूट पडताना मला दिसली होती, तेव्हाच मी ही युती तुटू नये म्हणून प्रयत्न करत होतो. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगत होतो की शिवसेनेसोबत अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मान्य करा. त्यांनी त्यावेळी माझं ऐकलं असतं, तर बरं झालं असतं. ते मुख्यमंत्री बनले असते. पण माझं कोणी ऐकलं नाही. त्यामुळे आता फडणवीसांवर 5 वर्ष विरोधी नेते राहण्याची वेळ आलेली आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. त्यावर बोलताना, “रामदास आठवलेजींनी योग्य वेळी योग्य व्यक्तींचे सल्ले ऐकले असते, तर ते स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते”, असं मजेशीर उत्तर फडणवीस यांनी दिलं.

अधिक वाचा  सध्या ‘मोबलींचीग’चे रोहित पवार आणि युगेंद्र पवार बळी अन् जीवालाही धोका; पोलीस सुरक्षा द्या: सुळेंची मागणी

संजय राऊतांबद्दलही केलं वक्तव्य

संजय राऊत म्हणाले होते की फडणवीसांनी संन्यासाची भाषा करू नये. ते खूप धडाडीचे नेते आहेत. गरज पडल्यास मी त्यांना घरी जाऊन समजावेन. या संबंधीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की मी २५ वर्षे राजकारणात आहे आणि पुढील २५ वर्षेही राजकारणात असेन याची खात्री आहे.

ज्या गोष्टी शक्य आहेत पण हे सरकार करत नाहीये त्यासाठी मी तसं बोललो होतो. तसेच, पत्रकारांनी असा प्रश्न देखील विचारला की संजय राऊत तुमची मुलाखत घेणार होते, त्याचं काय झालं? त्यावर फडणवीस चेष्टेने म्हणाले की कदाचित त्याचसाठी राऊत आशिष शेलारांना भेटले असावेत.