कोल्हापूर : जागतिक नेमबाजी क्रमवारीत २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्टल प्रकारात राही सरनोबतने सर्व नेमबाजांना धोबीपछाड देत अव्वल स्थान पटकावले आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनाने आणि सुवर्णपदकामुळे तिने हे स्थान पटकावले.

ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्टल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी राही जागतिक नेमबाजीच्या क्रमवारीत प्रथम असल्याचे ‘आयएसएसएफ’कडून जाहीर करण्यात आले आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे क्रीडा क्षेत्र ग्रासले असताना अनेक मुख्य स्पर्धा यामुळे बंद झाल्या आहेत.

अशातच टोकियोत होणारे ऑलिम्पिकही वर्षभर पुढे ढकलण्यात आले होते. आता ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठीचा भारतीय संघ सज्ज होत आहे. कोल्हापूरची नेमबाज राही २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्टल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अनेकदा स्पर्धेपासून दूर असताना खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मात्र, राहीने यावर मात करीत अधिक सक्षमपणे स्वतःला सिद्ध केले आहे.

अधिक वाचा  नाशिक मध्ये सस्पेन्स वाढताच इच्छूकांची सावध प्रतिक्रिया

दिल्ली येथे मार्च- एप्रिलमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेपूर्वी राही जागतिक यादीत अकराव्या स्थानी होती. या स्पर्धेनंतर राहीने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. ओसीजेक (क्रोएशिया) येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत विक्रमी गुणांसह सुवर्णपदक पटकावणाऱ्या राहीच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होऊन तिने प्रथम स्थान पटकावले आहे. ही बाब देशातील क्रीडा चाहत्यांसाठी समाधानाची आहे.

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान नक्कीच सुखावणारे आहे. यामुळे आगामी महत्त्वाच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी माझा आत्मविश्वास उंचावण्यास नक्कीच मदत झाली आहे.

– राही सरनोबत