बाभूळगाव : बेकायदेशार सावकारकीच्या पैशासाठी एका युवकाचे अपहरण करून पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून न दिल्याने एका खुनाच्या गुन्ह्यातील सावकाराने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे वनविभागाच्या हद्दीत घडली. हा युवक ९५ टक्के भाजल्याने त्याचा तीन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी सावकाराला अटक करण्यात आली असून, त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

नवनाथ हनुमंत राऊत (वय ३२, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), सोमनाथ भीमराव जळक (वय ३१, रा. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवराज उर्फ शिवराम कांतिलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आरोपींविरोधात त्याने फिर्यादी जबाब दिला आहे.

आरोपी सोमनाथ भिमराव जळक व फिर्यादी शिवराज ऊर्फ शिवराम कांतीलाल हेगडे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळून सावकारीच्या पैशासाठी त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करून मृृृृतदेह निमगाव केतकी येथील विहिरीत फेकून दिला होता. त्यावेळी इंदापूर पोलिसांनी दोघांनाही या गुन्ह्यात अटक करुन कारागृहात टाकले होते. काही दिवसांनंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते. तर सोमनाथ जळक व नवनाथ राऊत हे सराईत गुन्हेगार व खासगी सावकार असून त्यांनी अनेक गोरगरिबांच्या शेतजमिनी व जागा व्याजाच्या पैशात बळकावल्या आहेत. सोमनाथ जळकने पैशाच्या जोरावर दुसरा खून केल्याची चर्चा आहे.

७ जूनला सायंकाळी ७च्या सुमारास नवनाथ हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. या वेळी आरोपींनी नवनाथच्या पाठीमागून बंदूक लावून त्याला मोटारीत घालून त्याचे अपहरण केले होते. तुझ्याकडे आणखी पैसे निघतात, असे म्हणून १३ दिवस त्याला अज्ञातस्थळी एका खोलीत डांबून ठेवले. रविवारी (दि. २०) वरील आरोपींनी शिवराज उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी ६ च्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले व आरोपी पसार झाले.

अधिक वाचा  ‘गांधी आणि गोडसेंमध्ये मी…’, भाजपा उमेदवाराच्या उत्तरावरुन मोठा वाद

या घटनेत शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळून आग विझवली व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेऊन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हेगडे याच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तीन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्या दरम्यान फिर्यादीने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे.परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे हे करत आहेत.