नवी दिल्लीः केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात तिसरी आघाडी बनवण्याच्या चर्चा सुरू असताना आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू शकत नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीबाबत आपल्याला विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल यावरही आपला विश्वास नाही, असं किशोर यांनी सांगितलं.

किशोर यांचं हे वक्तव्य शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आलं आहे. प्रशांत किशोर यांनी आठवडाभराच्या कालावधीत सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरी आघाडी बनण्याच्या चर्चांना उधाण आलं. यापूर्वी किशोर यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये २ तासांहून अधिक वेळ चर्चा चालली.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची समोवारी दिल्लीत झालेली बैठक ही आगामी लोकसभा निवडणूक २०२४ डोळ्यासमोर ठेवून झाल्याचं बोललं जातंय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘मिशन २०२४’ सुरू केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झाली.