पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी जामीनासाठी केलेला हा पहिलाच अर्ज आहे. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या अर्जाची सुनावणी होणार आहे.

३२ हजारहून अधिक ठेवीदारांची हजारो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. त्यावर २४ जून रोजी सरकारी वकील आपले म्हणणे सादर करणार आहेत.

अधिक वाचा  नाशिकचा शिवसेनेचा उमेदवार ठरला, हेमंत गोडसे किंवा भुजबळ नाही…या पदाधिकाऱ्यास मिळणार संधी

कर्जाची परतफेड केली नाही म्हणून तुम्हाला दिवाळखोर का जाहीर करू नये, अशी कारणेदाखवा नोटीस सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने शिरीष कुलकर्णी यांना जानेवारी २०१९ साली पाठवली होती. त्यावर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित याचिका अद्याप प्रलंबित आहे. जोपर्यंत याचिकेवर प्रत्यक्ष सुनावणी होऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यांना दिवाळखोर जाहीर करू नये, अशी नोटीस बचाव पक्षाने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला बजावली आहे.