यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या प्रेम प्रकरणातील वादातून, या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने घडवून आणली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे, तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी बाळ बोठे याच्यासह एकूण सात आरोपींविरोधात पारनेर न्यायालयात आज (मंगळवार) पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती अजित पाटील यांनी दिली.

३० नाहेंबर २०२० रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून, निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकाचे छायाचित्र जरे यांच्या मुलाने काढले होते. याच छायाचित्रावरून पोलिसांनी दोन आरोपींना हत्येचा दुसऱ्या दिवशी अटक केली. यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर ‘मोबाईल सीडीआर’वरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.

अधिक वाचा  टेस्लाला श्याओमीच मोठं आव्हानं; स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारावर तांत्रिक तपास –

अहमदनगर शहरात गाजलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याच्या रागातून आपणास रेखा जरे हत्याप्रकरणात गोवले गेल्याचा दावा तपासादरम्यान बोठेकडून केला जात होता. मात्र पोलिसांनी परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारावर तांत्रिक पद्धतीने तपास केला व हत्येच्या मूळ कारणापर्यंत पोहचले. जरे यांच्याशी असलेल्या प्रेमप्रकरणातून दैनंदिन होणाऱ्या वादाला कंटाळून बोठे याने जरे यांची हत्या घडवून आणली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य व पुरवणी असे एकूण ११५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

आज बोठेसह महेश वसंत तनपुरे (नगर), जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी.अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व हैदराबाद) अशा एकूण सात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. बोठे याच्याविरोधात प्रेम प्रकरणातील वादातून कट रचून व हत्येची सुपारी देऊन रेखा जरे यांची हत्या करणे, तर इतर सहा आरोपींविरोधात बोठेला फरार होण्यास मदत करणे, आश्रय देणे असे विविध आरोप आरोपपत्रात करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  संजय काकडेंची पोस्ट; 100 नगरसेवकांचीही न्यारी गोष्ट चंद्रकांतदादांचा स्व-अनुभव पुण्याची उमेदवारी धोक्यात?

रेखा जरे हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात यापूर्वीच, २६ फेब्रुवारी रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.