पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यास विभागीय आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांनी नुकताच राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, पुणे महापालिकेनेही गावे समाविष्ट करण्यासंदर्भात ‘ना हरकत’ असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे महिनाभरात गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

महापालिकेमध्ये नव्याने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. २०१७ मध्ये महापालिकेमध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जाणार असल्याचे त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २३ गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला. त्यानुसार नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत सकारात्मक अहवाल राज्य सरकारला दिला होता.

अधिक वाचा  नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, तर पराभव करणार; बच्चू कडू यांचा कडाडून विरोध

दरम्यान, नगर विकास विभागाने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात मसुदा तयार केला. त्यावर तीस दिवसांत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयावर जवळपास ८५० हरकती दाखल झाल्या होत्या. मध्यंतरी विभागीय आयुक्तांनी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली; परंतु कोरोनामुळे या संदर्भातील अहवाल आणि आपला अभिप्राय राज्य सरकारकडे पाठविला नव्हता. नुकताच हा अहवाल विभागीय आयुक्तांनी सरकारला पाठविला आहे.

ही गावे होणार समाविष्ट

म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट

अशी असेल पुणे शहराची नवी हद्द

उत्तरेस – कळस, धानोरी व लोहगाव गावांची हद्द

पूर्वेस – मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, फुरसुंगी या गावांची हद्द

आग्नेय – उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या गावांची हद्द

दक्षिणेस – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या गावांची हद्द

नैऋृत्य – नांदेड, खडकवासला, नांदोशी, कोपरे या गावांची हद्द

पश्‍चिमेस – कोंढवे-धावडे, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, म्हाळुंगे, सूस या गावांची हद्द

वायव्य – बाणेर, बालेवाडी या गावांची हद्द

महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यासंदर्भात दाखल हरकती-सूचनांवर सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. त्या सुनावणी संदर्भातील अहवाल नुकताच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘या’ चार जागांवरून महाविकास आघाडीचं अडलं, तीनही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, आता दिल्लीतच वाद सुटणार

– सौरभ राव, विभागीय आयुक्त