मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीसमोर राजकीय व सामाजिक पेच निर्माण करणाऱ्या मराठा, ओबीसी आरक्षण तसेच मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नावर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी पक्षाची भूमिका मांडण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मलिक यांनी सांगितले की, शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हानिहाय करोना परिस्थितीची माहिती घेतली. करोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या अडचणी कशा दूर करता येतील, यावरही चर्चा झाली. या संदर्भात सीरम संस्थेशी बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती मलिक यांनी दिली.

अधिक वाचा  ‘ते’ महाराष्ट्रात आले, पण आमच्यावर टीका करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते ; उद्धव ठाकरे

केंद्रा सरकार सहकार कायद्यांमध्ये दुरुस्त्या करून राज्यातील जिल्हा व नागरी सहकारी बॅंका अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रा सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही, त्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर योग्य ती पावले उचलण्याचे ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि शासकीय सेवेतील मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षणावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापू लागले आहे. या तिन्ही विषयांवर बैठकीत चर्चा झाली.