करोनाच्या दुसऱ्या लाटेत योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेनंतर आयएमएनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांना याची दखल घेण्यास सांगितलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. तसेच फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडियानं १ जून रोजी संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे. आता योगगुरु रामदेव यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे.

“मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांविरोधात नाही. आयएमएविरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते दोन रुपयांचं औषध दोन हजार रुपयांना विकत आहेत. तसेच आवश्यकता नसताना ऑपरेशन आणि चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच औषधांचा धंदा करतात. आम्ही हा वाद संपवू इच्छित आहे.”, असं ट्वीट योगगुरु रामदेव यांनी केलं आहे.

अधिक वाचा  ‘दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा नारी रुप घेते तेव्हा…’, निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची पहिली प्रतिक्रिया

“जर अ‍ॅलोपॅथीत शस्त्रक्रिया आणि जीव वाचवण्याची औषधं आहेत. तर ९८ टक्के आजारांना योग आणि आयुर्वेदमध्ये समाधान आहे. योग-आयुर्वेद यांना स्यूडो सायन्स आणि अल्टरनेटिव थेरपी बोलणं खिल्ली उडवण्यासारखं आहे. ही मानसिकता देश सहन करणार नाही”, असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.

योगगुरु रामदेव यांनी यापूर्वी अ‍ॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले होते. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणं योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला होता. थॉयरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर एक एक करत त्यांनी २५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचं पत्रक त्यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं.

अधिक वाचा  अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, ‘मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..’