कोल्हापूर: खासदार संभाजीराजेंना सर्वाधिक सन्मान भाजपनेच दिला आहे, त्यांना चारवेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली असली तरी त्यापूर्वी चाळीस वेळा भेट दिली आहे, याबद्दल ते का सांगत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि करोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणप्रश्नी चारवेळा पत्र लिहूनही संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ दिली नाही, यामुळे संभाजीराजे नाराज आहेत. याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘छत्रपती घराण्याविषयी भाजपला प्रचंड आदर आहे. पक्षाने खासदार संभाजीराजे यांचा मोठा सन्मान केला आहे. खासदार होण्यासाठी त्यांना भाजपच्या कार्यालयात यावे लागू नये म्हणून मोदींनी त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. अहमदाबाद येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सगळ्यांनी उभे राहून खासदार संभाजीराजे यांना सन्मान दिला होता.

अधिक वाचा  निवडणुकीच्या तोंडावर धनगरांच्या पदरी पुन्हा ‘निराशा’; धनगर आणि धनगड वेगवेगळे, ‘सुप्रीम’चा मोठा निर्णय

रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना, प्राधिकरणाचे अध्यक्ष, गडकिल्ले संवर्धनासाठी निधी अशा विविध माध्यमातून संभाजीराजेंच्या कामाचा नेहमीच मान, सन्मान ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानात पक्ष कुठेही कमी पडला नाही. चार वेळा भेट मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नाही हे खरे असले तरी त्याला काही कारणे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट मागितली होती. पण हा मुद्दा सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीतच आहे. मग भेटून करणार काय? चार वेळा भेट झाली नसली तरी पूर्वी ४० वेळा भेट झाली आहे हे ते का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

अधिक वाचा  अभिनेता रणवीर सिंगने नोंदवली एफआयआर; नेमकं प्रकरण काय?

‘मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी जो संघर्ष होईल, त्यामध्ये पक्षाचा सहभाग असेल. संभाजीराजेच काय, कुणीही याचे नेतृत्व केले तरी भाजप त्यांच्यासोबत असेल. आरक्षण मिळण्यासाठी ज्यांना जे वाटेल ते करावे. भाजप त्यामध्ये सहभागी होईल. भले मग त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.

आरक्षणप्रश्नी मराठा समाज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असं पाटील म्हणाले. ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने तत्काळ मागास आयोगाची स्थापना करावी. करोनाचे संकट आहे म्हणून राज्य सरकारला कोणतीही जबाबदारी ढकलता येणार नाही,’ असंही त्यांनी सांगितलं. यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.