नवी दिल्लीः महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेले आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे संचालक झाले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केलीय. दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असतील. सीबीआय संचालकपदाच्या निवडीसाठी उच्चस्तरीय पॅनेलची सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत सुबोध कुमार जयस्वाल यांचे नाव आघाडीवर होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. या पॅनलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  ‘…त्यामुळे या चुका सुधारायला हव्या’; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?

सुबोध कुमार जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबई माजी पोलिस आयुक्तही आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून त्यांचे आणि ठाकरे सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले. सरकारच्या काही निर्णयामुळे जयस्वाल हे काहीसे नाराज होते. अशातच केंद्र सरकारने त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती.

सबीआयच्या संचालकपदाच्या शर्यतीत सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासोबतच आणखी तीन अधिकारीही स्पर्धेत होते. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावं चर्चेत होती. सीबीआयचे संचालक पद हे फेब्रुवारीपासून रिक्त आहे. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा ३ फेब्रुवारीपासून सीबीआयचे अंतरिम प्रमुख आहेत.

अधिक वाचा  ‘मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; प्रचंड गर्दीत मोहोळ यांचा अर्ज दाखल

सुबोध कुमार जयस्वाल हे संचालक झाल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सरकारला धक्का बसणार आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. तसंच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणही सीबीआयकडे आहे.