पुणे : भारतात करोना विषाणूने थैमान घातलेलं असताना लसीकरणात अडचणी येत असल्याने लसींच्या नियोजनावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. तसंच आमच्या मुलांच्या लसी बाहेरच्या देशांना का दिल्या? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतात करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पूनावाला यांनी या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘भारतातील लोकांच्या जीवाच्या बदल्यात आपण करोना लसींची निर्यात केलेली नाही. जेव्हा लसींच्या उत्पादनाला सुरुवात झाली तेव्हा भारतात करोनाची लाट ओसरली होती. मात्र त्याचवेळी इतर देशांमध्ये मात्र दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीत आपण इतर देशांना करोना लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला,’ अशी माहिती एक पत्रक जारी करत अदर पूनावाला यांनी दिली आहे.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

‘या महामारीला कोणत्या प्रादेशिक मर्यादा नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत संपूर्ण जग करोनाला हरवत नाही, तोपर्यंत आपणही सुरक्षित नाही. तसंच आपले काही जागतिक करार होते, ज्यानुसार COVAX जगभरात करोना लसींचा पुरवठा करू शकतील, यासाठी आपण त्यांना शब्द दिला होता,’ असंही पूनावाला यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

कधीपर्यंत होईल करोना लसीकरण?

अदर पुनावाला यांनी भारतात करोना लसीकरणाला होत असलेल्या विलंबावरही भाष्य केलं आहे. ‘भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या दोन देशांमध्ये येतो. त्यामुळे लगेच २-३ महिन्यात देशातील लसीकरण संपेल, असं नाही. संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी २ ते ३ वर्ष लागू शकतील,’ असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.