मुंबई: खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली, यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर मंगळवारी हैदराबादचा ऋद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं, त्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता चुका कुठे झाल्या, याचं पोस्टमॉर्टम आता सुरू झालं आहे. यातून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. 2020 साली दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये रेस्टराटा या व्यावसायिक कंपनीने बायो-बबल यशस्वीरित्या सांभाळलं होतं. ट्रॅकिंग डिव्हाईस आणि बायो-सिक्युर वातावरणात काम करण्याचा या कंपनीला बऱ्यापैकी अनुभव होता, असं सांगण्यात येत आहे. यावेळी मात्र बायो-बबल सांभाळायची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोडण्यात आली. हॉस्पिटल्सचे व्हेंडर्स आणि टेस्ट करणाऱ्या लॅब यांच्या हातात या प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार

सहा शहरांमधला विमान प्रवास हादेखील याला कारणीभूत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार दोन खेळाडू आणि एका सदस्याला विमानतळावरून प्रवास केल्यामुळे कोरोनाची लागण झाली. आयपीएल टीमनी खेळाडूंना विमानतळाच्या टर्मिनसवरून नेण्याऐवजी धावपट्टीवरून थेट हॉटेलमध्ये नेण्याची परवानगी मागितली होती, ज्यामुळे त्यांचा विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांशी आणि प्रवाशांशी संपर्क येणार नाही, पण वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारनी याला परवानगी दिली नाही, ज्यामुळे टीमचा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात यायाचा धोका वाढला. युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये कोणत्याही टीमने विमान प्रवास केला नव्हता.

खेळाडूंना देण्यात आलेली ट्रॅकिंग डिव्हाईसही खराब असल्याचं समोर येत आहे. ही ट्रॅकिंग डिव्हाईस चेन्नईतल्या एका कंपनीकडून घेण्यात आली होती. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात कोण आलं, याची माहिती हे ट्रॅकिंग डिव्हाईस देणार होतं, पण हे डिव्हाईस सदोष असल्यामुळे अचूक माहितीही मिळाली नाही.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

याचसोबत टेस्टिंग, क्वारंटाईन आणि बबलच्या बाहेर असणाऱ्या पण स्पर्धा चालवण्यासाठी गरजेच्या असलेल्या व्यक्तींच्या प्रोटोकॉलबाबतही प्रश्नचिन्ह होती. यामध्ये मैदान कर्मचारी, हॉटेल कर्मचारी, मैदानातले आचारी, नेट बॉलर, ड्रायव्हर यांचा समावेश होता. जास्त शहरांमध्ये सामने होत असल्यामुळे या व्यक्तीही बदलत आणि वाढत गेल्या.

मागच्या आठवड्यापर्यंत टीमना बाहेरून जेवण मागवायला परवानगी देण्यात आली होती. तसंच बीसीसीआयने प्रत्येक टीमला त्यांचे खेळाडू, सदस्य आणि कर्मचाऱ्यांचं बबल तयार करायला सांगितलं होतं, पण संपूर्ण स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयएमजीला ही जबाबदारी देण्यात आली नाही.

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती, तरीही बीसीसीआयने स्पर्धा भारतात खेळवण्याचा आग्रह धरला, पण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि फ्रॅन्चायजींनी स्पर्धा मागच्यावर्षीप्रमाणेच यंदाही युएईमध्ये खेळवण्यात यावी, अशी मागणी केली होती.