पुणे : शहरात संचारबंदी असूनही विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. पोलिसांकडून वारंवार सांगूनही नागरिक रस्त्यांवर फिरणे थांबवित नसल्याची सद्यस्थिती आहे. या प्रकाराची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्याही कारणाशिवाय शहरामध्ये कोणी फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईबरोबरच पोलिसांकडून योग्य तो ‘पाहूणचार’ केला जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रारंभी सायंकाळी सहानंतर संचारबंदी, त्यानंतर विकेंड लॉकडाऊन आणि रात्रीप्रमाणेच दिवसा संचारबंदी अशी उपाययोजना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली. सायंकाळी सहानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरीकांची संख्या कमी आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनलाही नागरीक घराबाहेर पडण्याचे टाळत चांगला प्रतिसाद देत आहेत. असे सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या दिवसाच्या संचारबंदीचा नागरीकांवर परिणाम होत नसल्याची सद्यस्थिती आहे. पोलिसांकडून नागरीकांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडवणूक होऊ नये, यादृष्टीने सहकार्याचीच भुमिका घेतली जात आहे. त्याचा नागरीकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याची शहरातीत सद्यस्थिती आहे.

अधिक वाचा  हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती पारा ४१ अंशांवर, उष्णतेच्या झळा किती दिवस राहणार?

वाहने व वाहन चालविण्याचा परवाना जप्तीची कारवाईही होणारच

सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच वैध कारणाशिवाय शहरात फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांची वाहने व वाहन परवाना जप्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता गुन्हे दाखल होणे, वाहने व वाहन परवाना जप्त होण्याबरोबरच पोलिसांच्या कडक कारवाईलाही नागरीकांना सामोरे जावे लागणार आहे.

अत्यावश्‍यक सेवा, वैद्यकीय कारण, अन्य महत्वाच्या कामांशी संबंधित नागरीकांनाच बाहेर पडण्याची परवानगी असतानाही अनेकजण दिवसा विनाकारण फिरत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात स्वतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे फिरत असताना त्यांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. त्यामुळेच त्यांनी यापुढे शहरात कोणत्याही सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांचा योग्य समाचार घेण्याच्याही सुचना दिल्या आहेत.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला

“नागरीकांकडून विकेंड लॉकडाऊन व दररोज सायंकाळी सहा वाजल्यानंतर नागरीक बाहेर पडत नाहीत, हे चांगले आहे. दिवसाही संचारबंदी असल्यामुळे वैध कारणाशिवाय कोणी बाहेर पडू नये, असे आम्ही वारंवार सांगत आहोत. असे असतानाही काही नागरीक, तरुण शहरात विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणूनच विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई व अन्य कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत.”

– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.