शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं दोन दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. यावरून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “भिडे गुरुजींचे विधान चुकीचे असून करोना कोणाकडे सांगून येत नाही.” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, राज्य सरकारचा वीकेंड लॉकडाउनचा निर्णय योग्य असल्याचेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात करोना संसर्गाने लोक प्रभावित झालेले असताना अशावेळी त्यांनी केलेले विधान हे चुकीचे आहे. करोना कोणालाही सांगून येत नाही. तो गरीब-श्रीमंत असा सर्वांना होतो आहे . हा शूर तो दुर्बल आहे असा हा संसर्ग विचार करत नाही. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत सर्वजण त्याचा सामना करत असताना असे बोलणे कधीही चुकीचे आहे.”

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?

तसेच, “शासनाने सध्या घेतलेला शनिवार-रविवारचा टाळेबंदी निर्णय योग्य आहे. परिस्थितीचा विचार करता नागरिकांनीही त्याला सहकार्य केले आहे. मात्र आजच्या तीन आठवड्यांच्या टाळबंदीच्या बातमीबाबत समाजामध्ये साशंकता आणि भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षभरातील वेळोवेळी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. आता गुढीपाडवा, ईद इत्यादी सण आहेत. त्यामुळे मोठ्या टाळेबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. सरकारने पण तडकाफडकी कोणताही निर्णय न घेता याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी.” असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

“सातारा जिल्ह्यात रेमेडिसीव्हर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे, रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत, जिल्ह्यातील लस उपलब्धतेबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी यानंतर इंजेक्शनचे राज्याचे वितरक आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्याशी बोललो आहे. लवकरात लवकर इंजेक्शन उपलब्ध होतील असे संबंधितांनी मला सांगितले आहे. आजच काही डोस जिल्ह्यात आल्याचे समजते आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याला काही वेगळा साठा मिळतो आहे का?” याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलून दाखवले.