महाराष्ट्रात करोनामुळे अभूतपूर्व परिस्थितीत निर्माण झाली आहे. दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.

केंद्र आणि राज्यात लस वाटपाच्या विषयावरून जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. दोन दिवसांपासून त्यामुळे वातावरण तापलं असून, याच मुद्द्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “करोना या विषाणूने हाहाकार माजवला आहेच, पण त्यामागचे राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे. माणसे सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढ्यांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे कधीच घडले नव्हते. करोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘##’ आहेत त्यांना करोना होणारच.

करोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील. महाराष्ट्रात व देशात करोना अनेक भल्याभल्यांना झाला. म्हणजे जे मेले ते मरायच्याच लायकीचे व ज्यांना करोना झाला ते ‘##’ ! भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. ‘मास्क’ वगैरे लावू नका, असे विचारही त्यांनी मांडले. आता देशाचे पंतप्रधान काय करणार? खरे तर आज प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय, छत्रपती शिवरायांनाही मास्क लावूनच सिंहासनावर बसावे लागले असते. करोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.

अधिक वाचा  इकडे ईडीची नोटीस, तिकडे लोकसभेचे तिकीट, अमोल किर्तीकर अखेर मैदानात

पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही. महाराष्ट्रात करोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राची जनता म्हणजे टिनपाट किंवा ##’ची अवलाद असा समज केंद्राने अलीकडच्या काळात करून घेतला असेल तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे. भिडे यांनी करोनाग्रस्तांना ##’ म्हटले. त्याऐवजी लसीचे राजकारण करणाऱ्यांना या ‘##गिरी’चा फटका मारला असता तर शिवरायांचे नाव राहिले असते,” असं म्हणत शिवसेनेनं सभाजी भिंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“संपूर्ण महाराष्ट्रात शिवराय भक्तीचे वारे वाहत असते. त्यामुळे हे राज्य मर्दांचेच आहे हे काय भिडे किंवा भाजपा पुढाऱ्यांना माहीत नाही? महाराष्ट्राशी आमनेसामने लढण्याची हिंमत नाही, तेव्हा हे असे छळवाद सुरू करायचे. केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्याबाबत जो अडेलतट्टूपणा करीत आहे तो ‘शिव’काळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे काय किंवा छत्रपती संभाजीराजे काय, महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते. ‘लसी’च्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे.

अधिक वाचा  असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?

पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत. आज चित्र पूर्णच पालटून गेलं. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. करोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. देशात कोविड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात.

पंतप्रधानांनी कोविडसंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात, जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तर महाराष्ट्राची ‘लसी’च्या बाबतीत न्याय्य मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला व आरोग्यविषयक गंभीर स्थितीत ‘वसुलीबाज’ वगैरे शब्द वापरून राजकारण किती ‘##’ पद्धतीने सुरू आहे ते दाखवून दिलं,” असं टीकास्त्र शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर डागलं आहे.

“महाराष्ट्रात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणानं. भाजपाशासित राज्यांना जास्तीत जास्त लस साठा पुरवला गेला आहे. उत्तर प्रदेशला ४४ लाख डोस, मध्य प्रदेशला ३३ लाख डोस, गुजरातला १६ लाख, कर्नाटक २३ लाख, हरयाणा २४ लाख, झारखंड २० लाख आणि महाराष्ट्राच्या वाट्याला रडतखडत कसेबसे १७ लाख डोस आले.

महाराष्ट्राची लोकसंख्या व करोना संक्रमणाची तीव्रता सगळ्यात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात माणसे राहात नाहीत असे केंद्राला वाटते काय? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकांत असंतोष भडकवायचा असे तर कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावे ना?,” अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

“मुंबईतील ५१ लसीकरण केंद्रं बंद पडली आहेत. राज्यातील लसीकरण ठप्प होईल अशी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असताना विरोधी पक्षाने अधिक गांभीर्याने वागण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची जनता त्यांचीही कोणीतरी लागतच आहे. याच जनतेने भाजपाचे १०५ आमदार निवडून दिलेच आहेत. महाराष्ट्राला दर महिन्याला १.६ कोटी तर आठवड्याला ४० लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे.

जेणेकरून दिवसाला सहा लाख लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा अर्धी, पण गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसी मिळूनही तेथील करोना परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अतिगंभीर बनल्याचे निरीक्षण गुजरात हायकोर्टाने केले. महाराष्ट्राचे मॉडेल वापरा असे गुजरात हायकोर्टाने तेथील सरकारला बजावले. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले.

पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणं आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेनं कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘##’ च म्हणावे लागेल,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.