मुंबई : लॉकडाऊनचे परिणाम चांगले आणि वाईट होत असले तरी गरज पडली, तर लॉकडाऊन लावावाच लागेल, असं ठोस वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व यंत्रणेशी चर्चा करत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

मात्र हे सांगताना पुढे टोपे असेही म्हणाले की आम्ही लगेचच लॉकडाऊनवर जाणार नाही, सध्या निर्बंध कडक करण्यावर भर दिला जाईल. मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे टोपे म्हणाले आहेत.

मुंबईत सध्या सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळे तिथली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यात येत असल्याचे टोपेंनी सांगितले. मुंबईत एक-दोन वगळता हॉस्पिटलची कमतरता नसल्याचेही टोपेंनी आश्वस्त केले.

अधिक वाचा  गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा

यावेळी राजेश टोपेंनी लसीकरणासंदर्भातही भाष्य केले. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी वन बूथ, टेन यूथप्रमाणे तरूणांना विश्वासात घेऊन 45वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, हात स्वच्छ धुत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असा पुनरूच्चारही राजेश टोपेंनी केला.