अर्थव्यवस्थेवरील करोना साथीचे पाश सैलावत असून, सरलेल्या मार्च महिन्यांत सरकारकडून गोळा करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी महसुलाच्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. मार्च २०२१ मध्ये या कराच्या माध्यमातून सार्वकालिक उच्चांकी १.२४ लाख कोटी रुपये संकलित केले गेले आहेत.

आधीच्या फेब्रुवारी महिन्यांतही जीएसटीच्या माध्यमातून सरकारने विक्रमी १.१३ लाख कोटी रुपये गोळा केले होते, तर मार्च महिन्यांतील संकलन हे त्यापेक्षा तब्बल १०,००० कोटी रुपयांहून अधिक १.२३ लाख कोटी रुपये नोंदविण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले. मागील सहा महिन्यांमध्ये जीएसटी संकलन सलगपणे एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले असून, साथीच्या सावटातून अर्थव्यवस्था सावरून गतिमानतेकडे कूच करीत असल्याचा हा स्पष्ट संकेत आहे, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

अधिक वाचा  उदयनराजे जिंकले अन् राष्ट्रवादीही, पुष्पवृष्टीस २५ जेसीबींचे बुकिंग, हारतुऱ्यांची ऑर्डर, दणक्यात स्वागत

बनावट बीजके बनविण्याच्या कुप्रवृत्तीला पायबंद, माहिती-तंत्रज्ञान प्रणाली मजबूत बनवून, जीएसटी, प्राप्तिकर आणि सीमा शुल्क अशा बहुविध स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचे सखोल विश्लेषण आणि त्या परिणामी कर-चोरीला आळा घालणारे प्रभावी कर प्रशासन व देखरेखीमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये कर-अनुपालनात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे करापोटी गोळा होणाऱ्या महसुलांतही वाढीला लक्षणीय हातभार लागला आहे, असे या वाढलेल्या संकलनामागील कारणे अर्थमंत्रालयाने सांगितली आहेत.

मार्चमधील संकलनात, केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) म्हणून २२,९७३ कोटी रुपये, राज्यांचे वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) संकलन २९,३२९ कोटी रुपये, एकात्मिक वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) म्हणून ६२,८४२ कोटी रुपये आणि उपकराच्या रूपात ८,७५७ कोटी रुपये असे एकंदरीत १,२३,९०२ कोटी रुपये इतके आहे.

अधिक वाचा  पुणे येथील वादग्रस्त लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्यावर ईडीच्या धाडी

मागील पाच महिन्यांमध्ये दिसून आलेल्या कलाप्रमाणे, मार्च २०२१ मधील जीएसटी संकलन हे, मार्च २०२० मधील संकलनाच्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे, अशी पुस्तीही अर्थमंत्रालयाने जोडली आहे.