इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन झाले. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.

अधिक वाचा  कोथरूड थोरात उद्यान्यामधील मोनोरेल प्रकल्प नागरिकांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही: मनपा आयुक्त

पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पार्थ पवार यांचा परिचय

पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपात

अधिक वाचा  माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत ! अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान चर्चेत

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला.

कोण आहेत अंकिता पाटील?
अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली