पुणेः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात जेव्हा कोरोनाचा फैलाव झाला तेव्हा पहिला रुग्ण हा पुण्यातूनच आलेला सापडला होता. परंतु वर्ष उलटूनही कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यात आज 3 हजार 226 रुग्णांची वाढ झालीय. तर आज दिवसभरात 35 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तसेच 725 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 268 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.

पुणे महापालिकेत आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिकेत आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. नगरसेवक आणि पदाधिकारीवगळता इतरांसाठी ही प्रवेशबंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारी ऑनलाईन करण्याच्या सूचना पुणे महापालिका प्रशासनानं केल्यात.

अधिक वाचा  ”प्रत्येकाला मतदानाची स्लिप मिळाली तर?” सुप्रीम कोर्टाचा प्रश्न निवडणूक आयोगाने सांगितला धोका अन् हे आश्वासन

पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर
सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेलं पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी 6 ते 8 हजार कोरोना बाधितांची भर पडतीये. त्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जातेय. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगत कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत.

पुण्यात एकाच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळेच पुण्यात क्लस्टर इन्फेक्शनला सुरुवात झाल्याचं निरिक्षण नोंदवलं जातंय. होम आयसोलेशनमधील लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्यामुळेच हे परिणाम दिसत असल्याचंही बोललं जातंय. अनेक जण कोरोना संसर्गानंतरही डॉक्टरांकडे जातच नसल्याचंही समोर येतंय. डॉ. अविनाश भोंडवे यांनी देखील याला दुजोरा देत आपली निरिक्षणं नोंदवली आहेत.