पाचगाव पर्वती येथील (तळजाई) राखीव वनातील फुलपाखरु वन उद्यान व लाकडी निरीक्षण कुटी चे उद्‌घाटन दत्तात्रय भरणे, वनराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा.श्री. सुजय दोडल, मुख्य वनसंरक्षक, भा.व.से. (प्रा.) पुणे, मा.श्री.राहुल पाटील, भा.व.से., उपवनसंरक्षक वन विभाग, पुणे व मा.श्री. सुभाष जगताप, नगरसेवक तसेच पाचगांव पर्वती ट्रेकर्स व स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

तळजाई वन उद्यानामध्ये मा.ना.श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे व मा.ना.श्री.दत्तात्रय भरणे, वनराज्यमंत्री यांचे प्रयत्नाने व श्री. राहुल पाटील, उपवनसंरक्षक यांचे मागदर्शनाखाली तळजाई वन उद्यानासाठी 13 कोटी निधीचे विकास आराखडयास मंजूरी प्राप्त झाली असून १३ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये निधी प्राधान्याने मंजूर करुन कामास सुरुवात करणेबाबत यावेळी मा. मंत्री महोदयांनी सूचना दिल्या. यामुळे तळजाई वन उद्यानामध्ये निसर्गाचा समतोल साधून वनउद्यानातील पर्यटकांचे सोयीसाठीची कामे करणे सोपे होणार आहे.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार

सदर कार्यक्रम प्रसंगी मा. वनराज्यमंत्री महोदयांनी पुणे शहराचा श्वास असलेली तळजाई टेकडीसाठी जे जे आवश्यक असेल त्यासाठी सर्व प्रयत्न करुन त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तळजाई टेकडीसाठी ‘सीएसआर’ फंडातून विकास कामे करणेबाबत प्रयत्न करण्यात येतील. तसेच राखीव वनात भटके व इतर कुत्र्यांमुळे वन्यप्राणी जसे – ससा , मोर यांवर होणा-या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करुन त्यावर कार्यवाही करणेबाबत सूचना दिल्या. निसर्ग ही आपली आई असल्याची भावना वनराज्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.

यानंतर मा.ना.वनराज्यमंत्री महोदयांचे हस्ते सावित्रीबाई फुले बांबू वस्तु विक्री केंद्र, सेनापती बापट रोड, पुणे याचे उद्‌घाटन झाले. यावेळी मा.श्री. सुजय दोडल, मुख्य वनसंरक्षक, भा.व.से. (प्रा.) पुणे , मा.श्री.राहुल पाटील, भा.व.से., उपवनसंरक्षक वन विभाग, पुणे, श्री सत्यजित गुजर, वनसंरक्षक (संशोधन) पुणे, नगरसेवक मा.श्रीमती राजश्रीताई काळे, श्री. आदित्य माळवे इत्यादि उपस्थित होते.

अधिक वाचा  महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट!; छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?

सावित्रीबाई फुले बांबू वस्तु विक्री केंद्र, हे पुणे शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असून या माध्यमातून वन विभागाच्या वन उपज जसे- बांबू व त्यापासून तयार केलेल्या वस्तु यांची विक्री करण्यात येणार असून सदरच्या वस्तु हया आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व इतर महिला बचत गट यांना रोजगार निर्मितीचे दृष्टीने वन विभाग एक साधन उपलब्ध करुन देत आहे. या माध्यमातून आदिवासी बांधव व इतरांचे व्यवसायाला चालना मिळेल. वरील कार्यक्रम प्रसंगी मा. वनराज्यमंत्री यांनी वन विभाग करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.

अधिक वाचा  मराठा आंदोलनाचा फटका नको ‘आपली’ मते सकाळीच उरका! राज्यभर मंदिरात बैठका घ्या या ३६ संघटना सक्रिय

सदरचे कार्यक्रमासाठी श्री. दिपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व त्यांचे अधिनस्त वन कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. सदरचा कार्यक्रम कोविड संदर्भातील सर्व नियम व शिस्तीचे पालन करुन अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पाडण्यात आला.