मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी बॅटिंग केली. पवारांनी क्वचितच अशा प्रकारे एखाद्या नेत्यासाठी बॅटिंग केली आहे. राजकारणात पुरावे असल्याशिवाय न बोलणारे, तोलूनमापून बोलणारे पवार देशमुखांची ढाल बनल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्कही व्यक्त केले जात आहेत. पवार देशमुखांच्या पाठी का उभे राहिले? त्यामागे नेमके राजकारण काय आहे? याविषयीचा घेतलेला हा आढावा…

पवार काय म्हणाले?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते.

माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला. सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नतेचा मोठा निर्णय; ११० महाविद्यालये रडारवर एप्रिल अखेर यादीच प्रसिद्ध

तर एनसीपीची प्रतिमा मलिन होणार?

परमबीर सिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास या प्रकरणाचं सर्व खापर राष्ट्रवादीवर फुटेल. तसेच या संपूर्ण घटनाक्रमामध्ये देशमुखांचा हात असल्याचं मानलं जाईल. त्यामुळेच पवार पुढे येऊन देशमुख यांचा बचाव करत आहेत. केवळ राजकीय षडयंत्रातून हे आरोप केले जात आहेत, भाजप आणि सिंग यांचं साटेलोटं असून सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, असं भासवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच परमबीर सिंग यांच्या पत्रापेक्षा अँटालिया प्रकरण अधिक गंभीर असून त्याकडे लक्ष देण्याचं पवार वारंवार पत्रकार परिषदेत सांगत होते. या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा त्यांचा या माध्यमातून प्रयत्न होता.

अधिक वाचा  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ

विदर्भातील राष्ट्रवादीचा चेहरा

देशमुख हे विदर्भातील आहेत. नागपूरच्या वाडविहीरा हे त्यांचं गाव. त्यांनी 1995मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पुढे ते राष्ट्रवादीतही सामील झाले. देवेंद्र फडणवीसांचा काळ सोडता देशमुख हे सातत्याने मंत्री राहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार पाहिला होता. राष्ट्रवादीला विदर्भात मजबूत करण्याचं काम देशमुख यांनी केलं आहे. विदर्भ भाजपचा गड असतानाही देशमुख यांनी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळे देशमुख हे विदर्भातील राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. देशमुख यांनी राजीनामा दिल्यास राष्ट्रवादीला विदर्भात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेही पवारांना देशमुखांसारखा नेता राजकीय षडयंत्राचा बळी पडू नये असं वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अधिक वाचा  गळीत हंगामाला साडेचार महिनेच पूर्ण राज्यातील १२० कारखान्यांचा हंगाम बंद; अद्यापही ८७ ठिकाणी हंगाम सुरू

पवारांचे निकटवर्तीय

देशमुख हे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी अजित पवार यांनी फडणवीसांशी हातमिळवणी केली होती. तेव्हा अजित पवारांना पर्याय म्हणून देशमुखांना पुढे करण्यात आलं होतं. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्रीपदासाठी देशमुख यांच्या नावाचीही खूप चर्चा झाली होती. परंतु अजित पवारांचं पुनरागमन झाल्यानंतर शरद पवारांनी देशमुखांना महत्त्वाचं समजलं जाणारं गृहखातं दिलं. शरद पवारांना विचारल्या शिवाय अनिल देशमुख कोणताही निर्णय घेत नसल्याची वंदता आहे. त्यामुळेच गृहमंत्रालयावर पवारांचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळेच पवार देशमुखांसाठी किल्ला लढवत असल्याचं बोललं जात आहे.