पुणे : सिंहगडावर जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची अडचण, गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृहासह इतर सुविधांची वानवा असताना महापालिकेने तेथे एक कोटी रुपये खर्च करून ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या आग्रहावरून हा ध्वज उभारण्यात येत असताना गडप्रेमींकडून रस्ता; तसेच इतर सुविधा उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.

स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ध्वज उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ३० मीटर उंचीचा ध्वज स्तंभ, विद्युत प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुशोभीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. आमदार तापकीर यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.

अधिक वाचा  अखेर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

शहरात सध्या उभारण्यात आलेले ध्वज वाऱ्याच्या वेगामुळे सातत्याने फडकवत ठेवणे अडचणीचे होते आहे. त्यात सिंहगडावरील ध्वज अधिक उंचीवर लावण्यात येणार असल्याने त्या ठिकाणच्या हवेचा वेग पाहता येथील ध्वज वाऱ्याचा वेग सहन करील का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सिंहगडावर जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्याने पर्यटकांचे हाल होतात. पावसाळ्यात अनेकदा हा रस्ता बंद ठेवावा लागतो. गडावरही पर्यटकांना पुरेशा व्यवस्था नाहीत. स्वच्छतागृहाची व्यवस्था अत्यंत मर्यादित असल्याने पर्यटकांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर गडावरील इतर व्यवस्था सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे

समाधीस्थळ परिसरात विकासकामे

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच

सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ परिसरात विकासकामे करण्यासाठी ७५ लाख रुपये खर्चाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. समाधीस्थळाच्या परिसरातील आणि प्रवेशाद्वारावरील सुशोभीकरण करणे, समाधीस्थळामागील सीमाभिंतीची उंची वाढवणे, लॉनमधील मावळ्यांच्या पुतळ्यांना पर्यटकांकडून हानी पोहोचविण्यात येऊ नये म्हणून त्यास आयर्न कास्टिंग लावणे आदी कामे करण्यासाठीच्या निविदांना मंजुरी देण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले