नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या चर्चेची माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

जो बायडेन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील संबंधांप्रमाणेच कायम राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, बायडेन यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रादेशिक मुद्द्यांवरील संयुक्त प्राथमिकतेवर चर्चा केली. तसेच आम्ही ग्लोबल वॉर्मिंगविरोधात आपले सहकार्य पुढे सुरू ठेवण्यावर सहमती व्यक्त केली.

अधिक वाचा  शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

मोदी पुढे म्हणाले की,राष्ट्रपती जो बायडेन आणि मी एका नियमाधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी कटीबद्ध आहोत. आम्ही भारत-पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आमि सुरक्षेसाठी आपली रणनीतिक भागीदारी भक्कम करण्यासाठी तत्पर आहोत.

जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. अमेरिकेतील यावेळची अध्यक्षीय निवडणूक कमालीची वादग्रस्त झाली होती. या निवडणुकीत जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता.