पुणे: महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.

मागील महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपचे वारे होते. त्यामुळे पुण्यात भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले. सत्ता मिळविण्यासाठी नव्या तसेच अन्य पक्षांतील आयारामांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक जण लाटेत निवडून आले. गेल्या चार वर्षांत बहुतांश नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, मानाच्या समजल्या जाणाऱ्या पदांवर केवळ बारा जणांना संधी मिळाली आहे. त्यामध्येही मूळ भाजपमधील आणि भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्यांमध्ये सुप्त संघर्ष उफाळला आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या कामकाजात आणि संघटनेतही उमटू लागले असून, आगामी निवडणुकीत भाजपला बंडखोरी-पक्षांतरे रोखण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे.

अधिक वाचा  लक्ष्मीनगर व सरस्वती शाळेत संविधान दिन साजरा; कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

भाजपच्या संघटनेतील जाणकारांनी मिळविलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे महापालिकेतील १९ नगरसेवक ‘काठावर’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या नगरसेवकांवर पक्षाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. येत्या निवडणुकीत यातील किती जणांना पुन्हा संधी मिळणार आणि किती जणांचा पत्ता कापला जाणार याचाही अंदाज सगळेच जण घेत आहेत. या व्यतिरिक्त भाजपच्या बालेकिल्ल्यात उपद्रव करू शकतील, अशा नगरसेवकांवरही लक्ष असल्याची माहिती उच्चपदस्थ नेत्याने दिली.

महापौर, उपमहापौरांचे काय?

विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्याकडे कायद्यान्वये वर्षभराचा कार्यकाल असला तरी, पक्षाने त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महापौरपदी मोहोळ कायम राहणार की अन्य कोणाला संधी मिळणार, हे गुलदस्तात आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देण्याचा शब्द देण्यात आला आहे.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

पदांवरून नाराजीनाट्य

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सुप्त संघर्षात ‘फुटबॉल’ होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. कार्यकारिणीत नियुक्त केलेल्या नेत्यांच्या निवडीवरूनही काही आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांच्या, नगरसेवकांच्या मुलांनाही संघटनेच्या इतर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागले आहे.

‘स्थायी’मध्ये महाभारत?

स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी अनेकांकडून ‘फिल्डिंग’ लावण्यात येत आहे. पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीमध्ये नव्या सहा सदस्यांना भाजपकडून संधी देण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्षपद विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडेच राहणार असल्याची शक्यता आहे. रासने आपले पद राखतात की पक्षांतर्गत स्पर्धक त्यांच्यावर कुरघोडी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.