गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी करू नका, घरीच विसर्जन करा, असे आवाहन पालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असताना मूर्तीचे पहिल्यांदाच मंदिरात विसर्जन करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने ट्रस्टने घेतला आहे. मंदिरातच गणपतीची मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेणारे हे पहिलेच मंडळ ठरले असून आता मानाचे गणपती आणि इतर मंडळांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

‘गणपतीची मूर्ती घरी विसर्जित करून करोनाचेही विसर्जन करा,’ असे आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केले आहे.

‘विसर्जन व सांगता सोहळ्याला गर्दी होऊ नये, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने गणपतीचे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. १२८ वर्षांत पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी मुख्य मंदिरात श्रींचे विसर्जन होणार आहे,’अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी मंगळवारी दिली.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

‘करोनाच्या धोका टाळण्यासाठी गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, म्हणून ट्रस्टने मंदिरामध्येच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या ऑनलाइन उत्सवाला गणेशभक्तांची उत्तम साथ मिळत आहे,’ असे गोडसे म्हणाले.

करोनामुळे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी गणपतीचे घरीच विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ सातत्याने करत आहेत. पालिकेने फिरते हौद तयार केले आहेत. या आवाहनाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत असताना तसेच दगडूशेठ गणपतीचे विसर्जन मंदिरात होणार असताना मानाचे गणपती आणि इतर मंडळे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

केवळ पुण्यातील नव्हे; तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी मंदिर अथवा मांडवातच‌ गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. नागरिक घराबाहेर पडले नाहीत, तर करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. करोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

– अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट