अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाल्यापासून या प्रकरणातील नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. अशात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यावर विषप्रयोग केला गेल्यामुळे त्याचे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. जेणेकरून हे विष ठराविक काळानंतर पोटात विरघळून जाईल हा यामागील उद्देश असून, याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची हीच वेळ आहे, असे सुब्रमण्यन स्वामी यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यन स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आता सैतानी मारेकऱ्यांची मानसिकता आणि त्यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे, हे हळूहळू उघड होत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या पोटात विष विरघळून जावे आणि ते ओळखता येऊ नये, यासाठी त्याचे शवविच्छेदन बळजबरीने उशिरा करवले गेले. जबाबदार असलेल्यांना पकडण्याची ही वेळ आहे.’ सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी सुब्रमण्यन स्वामी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत विविध मुद्दे उपस्थित करत आहेत.

अधिक वाचा  अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळेल? दिल्ली हायकोर्टात ईडीच्या अटकेविरोधात आज सुनावणी

सुब्रमण्यन स्वामी यांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी या प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिचे महेश भट्ट यांच्याशी झालेल्या संभाषणाद्वारे अडचणीत येऊ शकते असे स्वामी यांनी म्हटले होते. या पूर्वीच्या एका ट्विटमध्ये सुब्रमण्यन स्वामी यांनी विषप्रयोगाबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. या वेळी त्यांनी सुनंदा पुष्कर प्रकरणाचा आवर्जून उल्लेख केला. त्या प्रकरणात पोटात आढळलेल्या विषारी पदार्थामुळे ते प्रकरण उघड झाले. अशा प्रकारचा तपास अभिनेत्री श्रीदेवी आणि सुशांकसिंह राजूपत प्रकरणात करण्यात आला नाही, असे सांगत असतानाच सुशांतसिंह राजपूतचा खून झाला त्याच दिवशी अय्याश खान नावाचा ड्रग डिलर सुशांतला कशासाठी भेटला, असा सवालही सुब्रमण्यन स्वामी यांनी विचारला आहे.