महाविकास आघाडी सरकारने अलीकडे मंजूर के लेल्या प्रस्तावामुळे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार असला तरी ३० वर्षे जुन्या नसलेल्या परंतु धोकादायक झालेल्या इमारतींचे पुनर्वसन मात्र अडचणीत आले आहे. मात्र या धोरणात सुधारणा होऊ शकते, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशा इमारतीतील रहिवाशांना दिलासा दिला आहे.

जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत अगोदरच तरतूद आहे. या तरतुदीनुसार अशा इमारतींना ४० टक्के अतिरिक्त चटईक्षेत्रफळ आणि एकूण चटईक्षेत्रफळावर ३५ टक्के फंजिबल चटईक्षेत्रफळ देण्यात येते. उदाहरणार्थ : जुन्या इमारतीचा भूखंड हजार चौरस मीटर असल्यास एक चटईक्षेत्रफळ गृहीत धरले तर त्यावर ४० टक्के अतिरिक्त चटईक्षेत्रफळ म्हणजे १४०० चौरस मीटर आणि त्यावर ३५ टक्के फंजिबल चटईक्षेत्रफळ म्हणजे म्हणजे १८९० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकेल.

अधिक वाचा  मॅच जिंकताच विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

सध्याच्या नियमानुसार रहिवाशांना किमान चारशे ते साडेचारशे चौरस फुटाचे घर बंधनकारक असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या चटईक्षेत्रफळावर ४० टक्के अतिरिक्त चटईक्षेत्रफळ आणि अशा एकूण चटईक्षेत्रफळावर ३५ टक्के फंजीबल चटईक्षेत्रफळ मिळत असल्यामुळे शहरात सात ते आठ तर उपनगरात चार ते पाच इतके चटईक्षेत्रफळ सध्या दिले गेले आहे. पूर्वीच्या या निर्णयात सुधारणा करून आता इमारत ३० वर्षे जुनी असावी, ही अट नव्याने टाकण्यात आली आहे. या सुधारणेमुळे ३० वर्षांपेक्षा कमी कालावधीतील इमारत धोकादायक असली तरी तिचा पुनर्विकास करण्यात अडचण येण्याची शक्यता असल्याचे प्रसिद्ध वास्तुरचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी सांगितले.

अधिक वाचा  क्लासेनने ठोकल्या 80 धावा, तरी अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड का?

उपनगरातील खासगी सहकारी गृहनिर्माण संस्थांबाबत संदिग्धता
राज्य शासनाने १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय हा फक्त उपकरप्राप्त इमारतींसाठी लागू आहे. यामध्ये ३० वर्षे जुन्या इमारतींनाही लाभ देण्याचे ठरविण्यात आले असून त्यामुळे उपनगरांतील ३० हजार गृहनिर्माण संस्थांना लाभ होणार असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी दिले होते. मात्र हे धोरण सध्या फक्त उपकरप्राप्त इमारतींपुरतेच लागू आहे. उपनगरात धोकादायक असलेल्या दहा हजार इमारती असून त्यांच्यासाठी हे धोरण लागू करण्याबाबत संदिग्धता असल्याचे गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी सांगितले.

चटईक्षेत्रफळ म्हणजे काय?
भूखंडावर किती आकाराचे बांधकाम करता येऊ शकते त्याला चटईक्षेत्रफळ म्हणतात. उदा. १०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर एक चटईक्षेत्रफळ म्हणजे १०० चौरस मीटर तर दोन चटईक्षेत्रफळ म्हणजे २०० चौरस मीटर बांधकाम.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट

हे धोरण अंतिम नाही. त्यात सुधारणांना वाव आहे. याबाबत विविध सूचनांचे आम्ही स्वागत करू. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास तातडीने मार्गी लागावा, यासाठी सर्वसमावेशक धोरण अंतिम केले जाईल.

– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री