पुणे : पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (ता.१९) पदभार स्वीकारला. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.

प्रश्न : राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात आहेत. या संदर्भात उपाययोजना करताना कोणत्या बाबींना प्राधान्य देणार आहात?
उत्तर : शहरात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मुंबईच्या तुलनेत जास्त चाचण्या पुण्यात होत आहेत. त्यामुळे साहजिकच पुण्यातील रुग्ण संख्या अधिक आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाले आहे. केंद्र, राज्य सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट यावर भर देण्यात येत असून, कोरोनाचा प्रसार रोखता येईल. जिल्ह्यातील मृत्यूदर 2.27 टक्के असून, तो राज्याच्या (3.36 टक्के) तुलनेत कमी आहे.
प्रश्न : आपण यापूर्वी मुंबईतील हाफकिन बायोफार्मामध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संचालक म्हणून काम पाहिले आहे. याचा जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी कितपत फायदा होईल?
उत्तर : कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर राज्य सरकारच्या स्तरावर हाफकिन इन्स्टिट्यूटकडे विशेष जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. सीएसआरच्या माध्यमातून व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, मास्क यासह इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रुग्णालयांना वितरित करण्यात आले. तसेच, जुलैपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांशी समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी होती. नवीन प्रयोगशाळा तयार करण्यासह चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले. या बाबींचा कोरोनाशी सामना करण्यात निश्चितच मदत होईल.

अधिक वाचा  हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती पारा ४१ अंशांवर, उष्णतेच्या झळा किती दिवस राहणार?

प्रश्न : वाढती रुग्णसंख्या पाहता व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड्सचा तुटवडा भासत आहे. याबाबत कोणत्या उपाययोजना करीत आहात?
उत्तर : जम्बो हॉस्पिटलच्या माध्यमातून बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात येत असून, पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कधीपर्यंत आटोक्यात येईल?
उत्तर : आयसीएमआरचा अभ्यास, मुंबई शहरातील निष्कर्ष आणि इतर शहरांतील कोरोना केसेसचा अनुभव लक्षात घेता शहरात पुढील दोन-तीन आठवड्यांत परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येईल. कोरोना बाधितांच्या संख्येत घट होईल, असे वाटते.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

प्रश्न : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना काय आवाहन कराल?
उत्तर : उत्सव साजरा करताना स्वयंशिस्त हीच कोरोनावर महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. बहुतांश मानाच्या गणपती मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे मी स्वागत करतो. आपण सर्व गणेशभक्त आणि नागरिक मिळून नियमांचे पालन करून कोरोनाला पळवून लावूया.