पुणे: भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे. शिवसेना संभ्रमित झालीय. बावचळली आहे, त्यामुळे ते काहीही बडबडत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली. जस्टिस लोया प्रकरणाचा विषय कधीच संपला आहे. हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता. हे जगाला माहीत आहे.

मुंडेंचा अपघात होता हे सर्वांनी स्वीकारलंय. ते उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, असं सांगतानाच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण आणि लोया व मुंडे प्रकरणाचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमित झाली आहे. संत्रस्त झाली आहे. माणूस जेव्हा संत्रस्त होतो तेव्हा हवेत वार करत सुटतो. शिवसेनेची अवस्था तशीच झाली असून ते बावचळल्यासारखे बोलत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

अधिक वाचा  सांगलीत काँग्रेसचा ‘बाहुबली’ होतोय, पण ‘कटप्पा’च्या भूमिकेत कोण? हे पोस्टर व्हायरल राजकीय वर्तुळात चर्चा

या देशात लोकशाही आहे. त्यामुळे लोया आणि मुंडे प्रकरणात कुणाचं काही म्हणणं असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी करावी. साधं पोस्टकार्ड लिहूनही मागणी करता येते. सीबीआय पोस्टकार्डचीही दखल घेते, करावी मागणी. आमचं काही म्हणणं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्यचं नाव घेतलं नाही

सुशांतसिंह प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं अधिकृतपणे नाव घेतलं नाही. आम्हाला आदित्य यांच्याबाबत काही बोलायचं नाही. आमचं काही म्हणणं नाही. सीबीआय चौकशी करत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही कशाला बोलायचं?, असं सांगतानाच सुशांत हा बिहारचा मुलगा होता. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला.

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

इकडे मुंबई महापालिकेने बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वॉरंटाइन केलं. म्हणून बिहार भाजपने आदित्य यांच्या नार्को चाचणीची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करायला तयार नाही म्हणून त्यांनी मागणी केली. पण ही भाजपची अधिकृत मागणी नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेला बोलायला वेळ लागला आहे. त्यामुळे वेळ लागल्यावर माणूस नीट बोलतो असं मानलं जातं, पण हे बावचळल्यासारखे बोलत आहेत. शिवसेनेने आधी सोशल मीडियात संभ्रम निर्माण केला. आम्ही निर्माण केला नहाी. घटनाही तशाच घडल्याने याप्रकरणाचा संशय अधिक वाढला.

आता काहीही विधानं करून ते पुन्हा एकदा लोकांच्या मनातील संशय अधिक पक्का करत आहेत. कर नाही तर डर कशाला? असं लोकही म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी इकडच्या तिकडच्या मागण्या करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.