राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग सुटण्याची चिन्हं दिसू लागलीत. गेहलोत सरकार विरोधात जाऊन बंडखोरी करणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या १८ आमदारांसोबत पायलट यांनी राहुल गांधी यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला परंतु, अद्याप राहुल गांधी यांच्याकडून त्यांना कोणताही सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन पायलट काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या संपर्कात आहेत. याच माध्यमातून पायलट गट राहुल गांधींना भेटण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, राजस्थान काँग्रेस खासदारांनी पायलट आणि बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केलीय. येत्या १४ ऑगस्टपूर्वी पायलट टीम यांची भेट घेऊ शकतात. पक्षाकडून त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आलंय. त्यानंतर ते पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेण्यासाठी आणि तक्रार व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं सांगण्यात येतंय. राजस्थानात १४ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशनाला सुरुवात होतेय.

अधिक वाचा  केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायलट गटाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर पायलट गटाकडून थेट हल्ला केल्यानंतर आता पुन्हा एकदा पायलट यांना राजस्थानात पाठवण्यामुळे पक्षात एकजुटता राखणं शक्य होणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे, सचिन पायलट यांना पुन्हा पक्षात घेतलंच तर त्यांचं काय करायचं? हा प्रश्नही काँग्रेससमोर आहे.

दुसरीकडे, गेहलोत सरकार पाडण्याच्या आरोपानंतर आता भारतीच जनता पक्षही उघडउघड मैदानात उतरलाय. आत्तापर्यंत हे काँग्रेस पक्षातील वाद असल्याचं सांगणाऱ्या भाजपनं आता मात्र आपली रणनीती बदललीय. काँग्रेसच्या आमदारांच्या खरेदीच्या आरोपांनंतर आता भाजपनं आपल्या आमदारांना गुजरातच्या बाडाबंदीमध्ये हलवलंय. भाजपकडे एकूण ७५ आमदार आहेत. यात ३ आरएलपीचे आमदारही आहेत.