करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लशींवर संशोधन करण्यात येत आहे. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीकडे जगभराचे लक्ष लागले आहे. त्यातच आता या लशीची किंमतही समोर आली आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये ही लस प्रति डोस ३ डॉलर दराने उपलब्ध होणार असून भारतात एका डोसची किंमत २२५ रुपये इतकी असणार आहे.

करोनाला अटकाव करणारी लस गरीबांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी पुढाकार घेतला आहे. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘गावी'(GAVI)या संस्थेची स्थापना झाली असून जागतिक आरोग्य संघटनेचेही त्याला पाठबळ आहे. गावीच्या माध्यमातून लस विकसित झाल्यानंतर त्याचे जगभरात योग्य दरात आणि निष्पक्षपणाने वितरण करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट

ऑक्सफर्ड-AstaZeneca विकसित करत असलेली लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार आहे. सीरम ‘गावी’च्या माध्यमातून १० कोटी लस गरिबांना उपलब्ध करून देणार आहे. या लशीच्या एका डोसची किंमत २२५ रुपये असणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे आदार पुनावाला यांनी केली आहे. करोना विषाणूच्या बचावापासून किमान दोन डोस घ्यावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या चाचणीमध्ये स्वयंसेवकांना एका महिनाभराच्या कालावधीत दोन डोस देण्यात आले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटने याआधीदेखील भारतात सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax कंपनीसोबत लशींबाबत करार केला आहे. दरम्यान, जगभरातील लशींच्या समन्वयाचे काम करणाऱ्या ‘गावी वॅक्सीन अलायन्स’ने लशीच्या किंमती ठरवण्याबाबत पुढाकार घेतला आहे. जगभरात लशींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोवॅक्स केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘गांधी आणि गोडसेंमध्ये मी…’, भाजपा उमेदवाराच्या उत्तरावरुन मोठा वाद

कोवॅक्स केंद्राचे सहप्रमुख आणि गावी वॅक्सीन अलायन्सचे सीईओ सेथ बर्कले यांनी करोना लशीची किंमत ४० डॉलर म्हणजे जवळपास तीन हजार रुपये ठेवणार असल्याची माहिती दिली. तर, गरीब देशांना यापेक्षाही कमी दरात लस देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. युरोपीयन संघाच्या सूत्रांच्या माहितीनुसार श्रीमंत देशांमध्ये ही लस ४० डॉलरमध्ये उपलब्ध होणार आहे.