राष्ट्रपिता महात्मा गांधी आता भारतीय नोटांनंतर ब्रिटनच्या चलनावरही दिसणार आहेत. मूळ भारतीय असलेले ब्रिटिश अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. सुनक यांनी याबाबत ब्रिटनच्या चलनातील नाण्यांची डिझाइन आणि थीमचे प्रस्ताव पाठवणाऱ्या ‘रॉयल मिंट अ‍ॅडव्हाइजरी कमिटी’ला(RMAC) एक ई-मेल लिहिला आहे. सुनक यांनी हा ई-मेल ‘वी टू बील्ट ब्रिटन’ ( आम्हीही ब्रिटन बनवलंय) या मोहिमेच्या समर्थनार्थ लिहिला आहे. यामध्ये कृष्णवर्णीय व्यक्तिमत्वांना ब्रिटनच्या चलनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, ‘वी टू बील्ट ब्रिटन’ मोहिमेचं नेतृत्त्व करणाऱ्या जेहरा जाहिदी यांनाही सुनक यांनी पत्र लिहिलं आहे. यात, “कृष्णवर्णीय, आशियाई आणि अन्य अल्पसंख्यकांनी समुदायांनी युनाइटेड किंगडमच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिलं आहे. अल्पसंख्यांकांच्या अनेक पिढ्या या देशासाठी लढल्या”, असं नमूद केलं आहे. दरम्यान, सुनक यांच्या ई-मेलनंतर RMAC कडून गांधींजींच्या सन्मानार्थ चलनावर त्यांचा फोटो छापण्याचा विचार सुरू असल्याचं यूके ट्रेझरीच्या निवेदनात म्हटलं आहे.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?

भारतीय वंशाचे ब्रिटिश हेर नूर इनायत खान आणि जमैकन ब्रिटिश नर्स मॅरी सीकोल यांच्यासारख्या कृष्णवर्णीय व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून अशाप्रकारचे शिक्के जारी केले जाणार आहेत. ब्रिटिश चलनावर महात्मा गांधींच्या फोटोचा विचार सर्वप्रथम ऑक्टोबर 2019 मध्ये माजी मंत्री साजिद जाविद यांनी मांडला होता.