भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणेला गेल्या काही वर्षांपासून वन-डे संघात जागा मिळालेली नाही. कसोटी संघाचा अविभाज्य घटक असलेल्या अजिंक्यने याआधी अनेकदा वन-डे संघात पुनरागमनाचे प्रयत्न केले आहेत. परंतू प्रत्येकवेळी त्याला अपयश आलंय. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य आपला अखेरचा वन-डे सामना खेळला, यानंतर त्याला भारतीय वन-डे संघात स्थान मिळालं नाही. असं असलं तरीही अजिंक्यने वन-डे संघात पुनरागमन करण्याची आशा सोडलेली नाही.

“वन-डे संघात पुनरागमन करणं हे माझं पहिलं प्राधान्य असेल. मी सहसा रेकॉर्डबद्दल बोलत नाही, पण ज्यावेळी मला वन-डे संघातून वगळण्यात आलं त्याच्या ३-४ वर्ष आधी माझी वन-डे क्रिकेटमधली आकडेवारी ही चांगली होती. फलंदाजीत सलामीला येणं असो किंवा चौथ्या क्रमांकावर…माझा स्ट्राईक रेट चांगला होता.

अधिक वाचा  राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

त्यामुळे वन-डे संघात पुनरागमन करणं हे माझं ध्येय आहे. ही संधी कधी येईल मला माहिती नाही, पण त्यासाठी मी खूप मेहनत करतोय, आणि मला ती संधी मिळेल याबद्दल मी सकारात्मक आहे. तुम्ही स्वतःबद्दल किती सकारात्मक आहात आणि तुमच्यात किती आत्मविश्वास आहे यावर या गोष्टी ठरत असतात.” India Today शी बोलत असताना अजिंक्य रहाणेने आपलं मत मांडलं.

२०१४ साली रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्यला भारतीय वन-डे संघात संधी मिळाली. पण २०१८ नंतर अजिंक्य वन-डे संघात स्थान कायम राखू शकला नाही. अनेकदा निवड समितीने संधी असतानाही अजिंक्यचा वन-डे संघासाठी विचार केला नाही, याबद्दल अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

“मला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायची गरज नाही. आयपीएल हा तुमची कामगिरी सिद्ध करुन दाखवायचं चांगलं व्यासपीठ आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.” त्यामुळे अजिंक्य भारतीय वन-डे संघात कधी पुनरागमन करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.