दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर दरवाढ मिळावी यासाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. ठिकठिकाणी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दूध आंदोलन करत आहे. सांगलीमध्येही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले आहे. पण, यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे.

आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप आंदोलन करत आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘दूध आंदोलन करावे परंतु, कुठेही दुधाचा टँकर फोडू नये आणि दुधाची कुठेही नासाडी करू नका’, असे स्पष्ट आदेश राज्यातील सर्व भाजपच्या नेत्यांना दिला होता. पण, उत्साहाच्या भरात भाजपच्या नेत्यांनी सूचनेला वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या आहे.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

देवेंद्र फडणवीस यांचे खास आणि विश्वासू असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. यावेळी त्यांनी पडळकर यांनी कॅन भरून दूध हे गायींच्या अंगावर ओतून सरकारचा निषेध केला. त्यानंतर त्यांनी कॅनमध्ये उरले दूध हे रस्त्यावर फेकून दिले.

‘महाविकास आघाडी सरकारने दुधाचा दर कमी केला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. गायी आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर 10 रुपये वाढ करण्यात यावी’, अशी मागणीही पडळकरांनी केली. ‘सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा यापुढील काळात महायुती तीव्र आंदोलन पुकारले जाईल’, असा इशाराही पडळकरांनी दिला.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

त्याचबरोबर आटपाडी येथील दिघंचीमध्ये गायींना घेऊन रस्ता रोको आंदोलनही यावेळी करण्यात करण्यात आले आहे. यासह विविध मागण्यासाठी दिघांची मधील कराड-सोलापूर मार्गावर गायी आणि म्हशींना रस्ता रोको आंदोलन केलं.

भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही – राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारून काढलं आहे. ‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे’, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

‘भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर 5 रुपये जमा करावे, हाच सध्याचा महत्त्वाचा तोडगा ठरणार आहे. जर राज्य सरकारने लवकरच हे पाऊल उचलले नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.