मध्य प्रदेशात ज्योतरादित्य शिंदे – कमलनाथ, राजस्थानात सचिन पायलट – अशोक गेहलोत अशी काँग्रेसमधल्या तरुण – ज्येष्ठांत वाद उफाळून आले आणि पक्षाला मोठी त्याची किंमत मोजावी लागली. परंतु, काँग्रेसमधला तरुण पिढी आणि ज्येष्ठ पिढी यांच्यातील हा वाद इथेच संपलेला नाही. गुरुवारी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर अचानक तरुण नेते विरुद्ध ज्येष्ठ नेते असा वाद उफाळून आला. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. यावर राहुल गांधी यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या एका तरुण सदस्यानं त्यांचा जोरदार विरोध केलेला पाहायला मिळाला.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?

गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत, राहुल गांधी यांनी सर्व शक्ती पणाला लावूनही पक्ष उभारणीला वेग मिळालेला नाही, असं मत एका नेत्यानं व्यक्त केलं. यावर माजी मंत्री पी चिदंबरम यांनी पक्ष जिल्हा आणि स्थानिक स्तरावर कमी पडत असल्याचं सांगितलं. तर कपिल सिब्बल यांनी पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

यावर, राहुल गांधींचे जवळचे समजले जाणारे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी सिब्बल यांना जोरदार विरोध केला. आत्मपरीक्षण करायचंच असेल तर ते तेव्हापासून व्हायला हवं जेव्हा आपण सत्तेत होतो. सर्वात अगोदर आत्मपरीक्षण २००९ पासून २०१४ पर्यंत व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. इतकंच नाही तर यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सिब्बल यांच्यावर थेट निशाणा साधताना त्यांच्या कार्याचंही निरीक्षण व्हायला हवं, असं सातव यांनी म्हटलं. ‘यूपीए – २ मध्ये वेळेवर आत्मपरीक्षण झालं असतं तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या नसत्या’ असा टोलाही सातव यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना हाणला.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

या बैठकीत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए के एन्टनी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत खासदार पी एल पुनिया, रिपुन बोरा आणि छाय वर्मा यांनी, ‘राहुल गांधींनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घ्यावीत’ अशी मागणी केली.