दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. भाजपने याविरोधात आंदोलन करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले.

आ. पवार आज शुक्रवारी नगरमध्ये बोलत होते. सन २०१६ मध्ये जीएसटीचे केंद्र सरकारच्या निर्णयाने १६ हजार कोटींचे नुकसान झाले, त्याबद्दलही भाजप बोलत नाही. जीएसटीचा परतावा दिला म्हणजे केंद्र सरकारने उपकार केले नाहीत.

अधिक वाचा  ‘गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा

केंद्र सरकार सांगते, की ३३ हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला दिली, मात्र राज्यातील भाजप ७५ हजार कोटी रुपये दिले, असे सांगत आहे. हा निधी जीएसटीच्या सेस फंडातील आहे, तो लोकांचा आहे. भाजपने केवळ सत्य काय आहे ते सांगावे. भाजप राजकारण करत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

सरकार स्थापन झाल्यावर एक महिन्यात सरकार कोसळेल असे विरोधक सांगत होते, आता सहा महिने झाले आहेत, बोलता-बोलता पाच वर्षे कधी पूर्ण होतील, हे भाजपाला समजणारही नाही. सध्या करोना नियंत्रणच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अर्थकारण रुळावर आणून आरोग्यही जपायचे आहे, असे पवार म्हणाले.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटीलांचा अपघात, हात फॅक्चर, खुब्यालाही मार

अयोध्येतील राम मंदिराच्या निकालावर शरद पवार यांनी स्वागतच केले होते. शरद पवार यांच्या म्हणण्याचा अर्थ केवळ गर्दी होऊ नये, एवढय़ापुरता मर्यादित होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा उमाभारती काय बोलत आहेत, याला महत्त्व नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

चाचण्या वाढवणार
सध्या नगर जिल्ह्यात करोनोचे रुग्ण वाढत असले तरी गंभीर स्वरूपाचे रुग्ण कमी आहेत. सध्याच्या परिस्थितीत अधिकाधिक चाचण्या होणे आवश्यक आहे. सध्या रोज १ हजार २०० चाचण्या होत आहेत, ही संख्या ३ हजार ५०० पर्यंत वाढविली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जेवढय़ा अधिक चाचण्या होतील तेवढे चांगले, जिल्हा सरकारी रुग्णालयात आणखी एक आयसीयू युनिट सुरू करण्यात आले आहे, असे आ. पवार यांनी सांगितले.