वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरपाईचे १९ हजार २३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. जे लोक वारंवार केंद्र सरकारवर आरोप करीत होते, त्यांनी आता केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत. पंतप्रधान सहाय्यता निधीतून (‘पीएम केअर’) सुद्धा सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. मी त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतो. आता मंत्र्यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.
मर्यादित लोकप्रतिनिधींमध्ये अधिवेशन घेण्यास आमचा विरोध आहे. कोणत्याही सदस्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अयोध्येतील राममंदिराचे ई—भूमिपूजन करण्याची मागणी एमआयएमने केली आहे आणि आता तीच मागणी मुख्यमंत्री का करतात, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत शासकीय अधिकाऱ्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल. हे योग्य नसून त्याकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त