पुण्यात कोरोनाव्हायरलचा वाढता प्रकोप राज्याच्याच नव्हे तर देशाच्या चिंतेचा विषय ठरला आहे. केंद्रीय पथकानेही पाहणी करून शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेत काही सूचना दिल्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे दौरा करायचं निश्चित केलं आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पुण्याचा दौरा करतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच दिली आहे.

राज्यातला प्रत्येक तिसरा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे, इतकी इथली परिस्थिती भीषण आहे. शरद पवारांच्या दौऱ्याच्या सूचनेनंतर आणि भाजपने केलेल्या शेरेबाजीनंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा ठरला, अशी चर्चा आहे. अजित पवारांनी पुण्यात कोरोनासंबंधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती दिली.

अधिक वाचा  जर गद्दारी होत असेल तर…; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना दिला मोलाचा संदेश; लाँच केलं ‘मशाल गीत’

मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचं अजित पवार म्हणाले. आजच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करण्याचा सल्ला दिला होता, हे विशेष. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता.

पुण्यात कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे आणि साथ आटोक्यात आणण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. याचं खापर अजित पवार यांच्यावर फुटावं म्हणून मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा थेट सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, पुण्यातल्या कोरोनास्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रिय पथकाने पुण्याचा दौरा केला. या पथकाने बैठक घेऊन पुण्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना काही सूचनासुद्धा केल्या. एकूण एक रुग्णाचं प्राण वाचवणं हा प्रत्येक अधिकाऱ्याचा अग्रक्रम असला पाहिजे, असं या बैठकीत सांगण्यात आलं. सर्व कोविड रुग्णालयांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याच्या सूचना या पथकाने केल्या आहेत.