अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी आता अयोध्याला जायचे की नाही हे ठरवावे, असा सल्ला देताना त्यांना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

अयोध्येमध्ये राम मंदिर भूमिपूजन समारंभ ५ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात गर्दी करण्याऐवजी तो ऑनलाइन ई-भूमिपूजन पद्धतीने करावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मत व्यक्त केले. तत्पूर्वी भाजपच्यावतीने त्यांनी आधी मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

अधिक वाचा  शिवकालीन श्रीक्षेत्र म्हस्वेश्र्वर खारावडे वज्रलेपविधी पुर्ण; 500 किलो शेंदूरलेपाचे जला विसर्जन पुन्हा मंदिर खुले

पाटील म्हणाले, “राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी ५०० वर्षे संघर्ष सुरू आहे. काही न करता तुम्ही राम मंदिर उभारणीचा श्रेय घेत आहात. आता प्रत्यक्ष राम मंदिर उभारण्याची वेळ आली आहे. जगामध्ये हा रोमांचकारी क्षण अनुभवण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशावेळी कोट्यवधी लोकांना घेऊन नाही तर मोजक्या ३०० लोकांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ होत आहे. अशा वेळी शिवसेनेची पंचायत झाली आहे.”

या कार्यक्रमाचे निमंत्रण आले तर पाहू असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. आता संयोजकांच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना रितसर निमंत्रण दिले आहे. आता त्यांच्या पुढे प्रश्न वेगळाच उभा आहे. आगामी निवडणूक त्यांना राष्ट्रवादी सोबत लढवायची आहे. राष्ट्रवादीने सातत्याने मुस्लिमांचे लांगुलचालन केले आहे. आता ही मतपेटी टिकवायचे असेल तर शिवसेनेलाही याचेच अनुकरण करावे लागणार आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राम मंदिर भूमिपूजनाला जायचे की खुर्ची टिकवायची, अशा कठोर शब्दांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

अधिक वाचा  लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या बैठकीत हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारहाण बैठक उधळली आणि पुढे राडाच

विपश्यनेच्या सल्लाचा विचार करू
करोनाच्या काळात भाजपाने टीका टिप्पणी करू नये, याऐवजी त्यांनी विपश्यना करावी, असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला दिला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. सल्ला हा आपुलकी वाटते अशांनाच दिला जातो. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचा आम्ही विचार करू”

क्षीरसागर, आधी आपली अवस्था पाहा!
कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्यावर “आंबा पडल्याप्रमाणे ते अचानक उगवले” अशा शब्दांत टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या पराभवाकडे लक्ष वेधत “त्यांनी आधी आपली काय अवस्था झाली आहे याचा विचार करावा आणि नंतर इतरांवर बोलावे” असा टोमणा लगावला.