पिंपरी : करोना रुग्णांच्या उपचाराचे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख केंद्र असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) डॉक्टरांना भाजपच्या एका नगरसेवकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (२७ जुलै) सकाळपासून रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत भाजप आमदारांनी मध्यस्थी करत योग्य कार्यवाही तसेच डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

चव्हाण रुग्णालयात जोखमीचे आजार असलेल्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून या नगरसेवकाने सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास करोना केंद्रातील डॉक्टरांना शिवीगाळ केली. तेथील दरवाजावर लाथा मारल्या, खुर्च्या फेकून दिल्या. काहींना धक्काबुक्की केली. नगरसेवकाच्या या राडेबाजीमुळे रुग्णालयात गोंधळ उडाला.

अधिक वाचा  शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले, एक राक्षस तर दुसरा…

रात्रीची वेळ असतानाही या घटनेची वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरली. सोमवारी सकाळी डॉक्टर, परिचारिका, सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. प्रवेशद्वारापाशी त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याची माहिती मिळताच पालिका पदाधिकारी, आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. सर्व जण एकापाठोपाठ रुग्णालयात दाखल झाले.

महापौर, आयुक्तांसह अनेकांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. त्यांना यश आले नाही. सततच्या अशाप्रकारांनी त्रस्त झालेल्या डॉक्टरांचे आंदोलन सुरूच होते. अखेर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी रुग्णालयात येऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी जगताप यांनी अधिकाऱ्यांना सर्वासमोरच फैलावर घेतले. तर, रात्रीपासून सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी बंद असल्याच्या कारणावरून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अधिक वाचा  महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट!; छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?

डॉक्टरांवर हल्ले नेहमीचेच
रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण होणे तथा शिवीगाळ होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. अशा घटनानंतर होणारी आंदोलने राजकीय दबावातून मागे घेतली जातात. ठोस कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच पुन्हा-पुन्हा डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार सुरूच आहेत.

या प्रकारांना कंटाळलेल्या डॉक्टरांनी आम्हाला संरक्षण मिळाले पाहिजे, हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा मागण्या यापूर्वी अनेकदा केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डॉक्टरांवर सातत्याने हल्ले होत आले आहेत. डॉक्टरांना नगरसेवकाने केलेली शिवीगाळ ही निंदनीय घटना आहे.

त्याने डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकीही दिली. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या कामात नगरसेवक, राजकीय कार्यकर्त्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे.
– डॉ. अजित माने, आंदोलक प्रतिनिधी

अधिक वाचा  ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार

करोना सुरू झाल्यापासून उपचारकार्यात असलेल्या डॉक्टरांशी सातत्याने असभ्य वर्तन केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कोणीही तक्रार दिली नाही.

नगरसेवकाने केलेल्या शिवीगाळीविषयी पोलिसांना कोणी काहीही सांगितले नाही. तरीही आम्ही माहिती काढून पुढील कार्यवाही करू. रुग्णालयातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येईल.
– मिलिंद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी