२१व्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारगिल युद्धात अतुलनिय शौर्य गाजवलेल्या सर्व जवानांच्या धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला आहे. तसेच कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचं प्रतिक असल्याचंही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

शाह म्हणाले, “कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचं प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथं पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे.”

जवानांच्या शौर्याला सलाम – राजनाथ सिंह
दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील २१व्या कारगिल विजय दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी म्हटलं, ” संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो.”

अधिक वाचा  चौकशी होऊन जाऊ द्या, शरद पवार यांचे सिंचन घोटाळ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

संपूर्ण देशभरात आज २१वा कारगिल विजय दिन साजरा होत आहे. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना २६ जुलै १९९९ रोजी याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारत कारगिल युद्ध जिंकलं होतं.

पाकिस्तानने विपरीत हवामानाचा गैरफायदा घेत भारताची कारगिल पोस्ट ताब्यात घेतली होती. ही पोस्ट परत मिळवण्यासाठी ऑपरेशन विजयची योजना आखण्यात आली होती. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि शौर्य गाजवणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिन साजरा केला जातो.

या युद्धात आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि शौर्य गाजवणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिन साजरा केला जातो.