मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५०वा वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसह विरोधकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसोबतचा एक फोटोही शेयर केला आहे.
‘महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना’, असं ट्विट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी विधानभवन परिसरातला अजित पवारांसोबतचा एक फोटो हे ट्विट करताना शेयर केला आहे.

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच

‘महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांवर आपण नेहमीच धडाडीने निर्णय घेत असतात. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना’, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं.

दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवारांनी पहिले देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं, या ट्विटला फडणवीस यांनी रिप्लाय करत अजितदादांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिराती, होर्डिंग, उत्सव याऐवजी सेवाकार्यात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असं भाजपने कार्यकर्त्यांना सांगितलं.