मुंबई: मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर करोना होऊन आपोआप बराही झाला असून मुंबईकरांना करोना झाल्याचं कळलंही नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका खासगी लॅबमध्ये सुरू असलेल्या अँटिबॉडी टेस्टमध्ये हा खुलासा झालाचं उघड झालं आहे.

या खासगी लॅबमध्ये काही लोकांची तपासणी केली असता त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या लोकांना करोना झाला असल्याचं सिद्ध होत असून धक्कादायक म्हणजे करोना झाल्याचं त्यांना कळलेलं सुद्धा नाहीये.

.भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याच रिपोर्टच्या आधारे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून एक लाख लोकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत ३२.१५%, घाटकोपरला ३६.७%, सांताक्रुझला ३१.४५% तर बांद्रा पश्चिमेला १७% लोकांना करोना इन्फेक्शन होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेने मुंबईत अशा १ लाख चाचण्या करुन करोनाचा वास्तववादी अहवाल मांडावा, असं शेलार यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

अधिक वाचा  क्लासेनने ठोकल्या 80 धावा, तरी अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड का?

शरीरात अँटिबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा करोना होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे शेलार यांनी या सर्व बाबींचा वास्तववादी अहवाल मांडण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. तसेच ही तपासणी करताना पालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, काल तब्बल ८ हजार २४० नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ३ लाख १८ हजार ६९५ इतकी झाली आहे. त्यात पुणे महापालिका क्षेत्रात ६५ हजार २८६ तर मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख २ हजार ४२३ रुग्णांची संख्या झाली आहे. राज्यात काल दिवसभरात १७६ करोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं करोनाबळींचा आकडा आता १२ हजार ०३० पर्यंत पोहोचला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७७ इतका आहे. सध्या राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ जणं होम क्वारंटाइन आहेत तर ४५ हजार ४३४ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

अधिक वाचा  ‘दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा नारी रुप घेते तेव्हा…’, निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगरमनपा-६, वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.