पुणे : रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांसंबंधी विविध कामे तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी रेल्वे गाडय़ा रद्द करून करावी लागणाऱ्या कामांसाठी मध्य रेल्वेने टाळेबंदीची संधी साधली आहे. बहुतांश रेल्वे गाडय़ा बंद असल्याने पुणे विभागासह राज्यातील विविध स्थानकांवर प्रामुख्याने पादचारी पुलांची कामे गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली आहेत.

मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात टाळेबंदी लागू झाल्यानंतर रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली. त्यानंतर केवळ मालवाहतुकीतील गाडय़ा आणि जूनपासून विशेष प्रवासी गाडय़ा सोडण्यात येत आहेत. मात्र, गाडय़ा बंदच्या या कालावधीचा उपयोग रेल्वेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करून घेतला आहे. इतर वेळेला ही अत्यावश्यक कामे करण्यासाठी संपूर्ण वाहतूक किंवा काही गाडय़ा बंद ठेवण्याची आवश्यकता भासली असती.

अधिक वाचा  … नाहीतर माझं काही खरं नाही… अजित पवार यांनी प्रचारात सांगितला

टाळेबंदीच्या आतापर्यंतच्या कालावधीत मध्य रेल्वेकडून १४ पादचारी पुलांचे स्टील गार्डर उभारण्याचे आणि ९ पादचारी पुलांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्थानकांत २३ ठिकाणी पायाभूत सुविधांबाबतची कामे पूर्ण करण्यात आली. त्यात मुंबई विभागातील ७, भुसावळ विभागातील १०, पुणे विभागातील ३, तर नागपूर आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी एका कामाचा समावेश आहे.

पुणे विभागातील चिंचवड, कडेठाण पादचारी पुलाच्या गार्डरची उभारणी, तळेगाव स्थानकात दुरुस्ती आणि भवानीनगर स्थानकात पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात आले. दौंड स्थानकावर पादचारी पुलाच्या गार्डर उभारणीचे काम सुरू करण्यात आले. मुंबई विभागात डोंबिवली, बेलापूर, वडाळा रोड, अंबरनाथ, अंबिवली, आटगाव, वाशिंद आदी स्थानकांमध्ये पादचापरी पुलासंबंधीची कामे करण्यात आली.

अधिक वाचा  बच्चू कडूंना ठाकरेंनी पैसा पुरवला, रवी राणांचा सर्वात मोठा आरोप, संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान!

नागपूर विभागातील वर्धा येथे पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. भुसावळ स्थानकात जुन्या पुलाची दुरुस्ती, बडनेरा, अकोला, चांदूर बाजार, नाशिक रोड आदी स्थानकांतही पादचारी पुलांसंबंधी कामे करण्यात आली.