बिहार व त्यानंतर सहा महिन्यांनी पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून देशात राम मंदिर बांधकामाचे भावनिक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने या भूमिपूजनाची रुपरेषा आखण्यात आल्याची चर्चा आहे.

नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली असून भाजप या निवडणुकीविषयी साशंक आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे तीन-साडेतीन वर्षे लागणार असून सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राम मंदिराच्या मुद्याचा लाभ होईल, असे भाजपचे राजकीय गणित आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे भूमिपूजन येत्या ५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून राम मंदिर आंदोलनाशी संबंधित नेते आणि संतांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाने अद्याप दुजोरा दिलेला नसला तरी त्यांचा सहभाग निश्चित आहे. या समारंभासाठी आमंत्रितांची यादी तयार करण्यात येत असून सूत्रांच्या मते करोना संकटामुळे निमंत्रितांची यादी तीनशे लोकांपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे.

अधिक वाचा  आमची चौकशी होत नाही, धमक्या दिल्या जात आहेत, त्यापेक्षा आम्हीच मरतो; धनंजय देशमुख आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राम मंदिर आंदोलनात भाग घेतलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतुंभरा, विहिंपचे आलोककुमार आणि मिलिंद परांडे यांच्यासह अनेक मान्यवरांना औपचारिक निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचे समजते. सुरक्षित वावर निश्चित करून या सोहळ्यात भाग घेणाऱ्या अतिमहत्त्वाच्या ५० व्यक्तींसह एकूण निमंत्रितांची संख्या तीनशेपेक्षा जास्त नसेल. अयोध्येत पाच-सहा स्थळांवर भव्य एलईडी स्क्रीन लावून भाविकांनाही भूमिपूजनाचा सोहळा थेट बघता येईल.

अधिक वाचा  ‘महारेरा’ची कारवाई जोरात! 1950 प्रोजेक्ट सस्पेंड बँक खाती गोठवली पुण्यातील सर्वाधिक प्रकल्प ; 3499 प्रकल्पांची कारवाई प्रक्रिया हाती

भूमिपूजनाचे अनुष्ठान ३ ऑगस्टपासूनच सुरू होणार असून त्यासाठी काशीच्या विद्वान पंडितांना निमंत्रित करण्यात येणार आहे. करोना संकटामुळे या अनुष्ठानासही मर्यादित संख्येत लोक उपस्थित राहतील. सध्या मंदिर परिसरातील जमीन समतोल करण्यात येत असून भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल. शनिवारी अडीच तास चाललेल्या ट्रस्टच्या बैठकीत या संबंधातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

४० किलो वजनाची चांदीची वीट
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. आता ५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन केल्यास सर्वार्थ सिद्धी प्राप्त होईल, अशी भावना असल्यामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा मुहूर्त निश्चित केला आहे.

४० किलो वजनाची चांदीची वीट ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य राम मंदिराच्या बांधकामाचा शिलान्यास करतील. जमिनीच्या साडेतीन फूट खाली ठेवल्या जाणाऱ्या विटेमध्ये नक्षत्रांचे प्रतीक असतील, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडतयं…तुम्ही अपयशी झालायं…

असे असेल भव्य राम मंदिर
प्रस्तावित राम मंदिराचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा दहा हजार चौरस फुटांनी जास्त म्हणजे ४७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाऐवजी ५७ हजार चौरस फूट असेल. एकूण पाच शिखरे आणि तीन मजले असलेल्या या मंदिराची उंची १२८ फुटांऐवजी १६१ फूट करण्यात आली आहे.

मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यांवर सीता, लक्ष्मण, भरत आणि गणेशाची मंदिरे बांधण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर १०६ स्तंभ असे एकूण ३१८ स्तंभ असतील. प्रत्येक स्तंभ साडेचौदा फुटांचा असेल आणि त्यावर १६ मूर्ती कोरल्या जातील.