अयोध्या : राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. ‘राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिराचं भूमी पूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. ट्रस्टकडून या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचाही समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण धाडण्यात येणार आहे.

‘ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही’
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकारनं निश्चित झाल्यानंतर या सोहळ्यासाठी, मंदिर उभारणीबाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याची जोरदार चर्चा सुरू होती.

अधिक वाचा  ‘या’ चार जागांवरून महाविकास आघाडीचं अडलं, तीनही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, आता दिल्लीतच वाद सुटणार

राममंदिराच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगीही शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु, अद्याप आमंत्रण न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत’ अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

३०० जणांना आमंत्रण धाडणार?
याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत, गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येईल.

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून आमंत्रितांची यादी सीमित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३०० लोकांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात येऊ शकतं.

१९८९ सालच्या आठवणी पुन्हा जागृत करणार
१० नोव्हेंबर १९८९ साली विश्व हिंदू परिषदेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शिलान्यास कार्यक्रमासाठी ज्या पद्धतीनं वातावरण तयार करण्यात आलं होतं तोच उत्साह पुन्हा जागृत करण्याची ट्रस्टची योजना आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी यासाठी परवानगी दिली होती.

ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपल यांच्या म्हणण्यानुसार, आडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन लोकांपर्यंत पोहचवलं होतं. भाजपच्या इतर नेत्यांनीही ते लोकप्रिय बनवण्यासाठी मदत केली होती. ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांचे प्रवक्ते महंत कमल नयन दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे भूमी पूजन कार्यक्रमावेळी गर्भगृहात चांदीच्या पाच विटा अर्पण केल्या जातील.