कोल्हापूर: चार महिन्यानंतरही लॉकडाऊन हटत नसल्याने दक्षिण महाराष्ट्रातील फाउंड्री उद्योगासमोरील संकट अधिक गडद होत आहे. यामुळे तब्बल १५०० कोटीचा दणका बसला आहे. परदेशातील निर्यातीचा वाढलेला खर्च, मागणीत झालेली घट, न मिळणारा कच्चा माल आणि परप्रांतीय मजूरांची कमतरता यामुळे हा उद्योग ‘लॉक’ झाला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरातील कडक लॉकडाऊनचा मोठा फटका या उद्योगाला बसला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातून परदेशासह देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यामध्ये वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, साखर, गूळ,सूत, गारमेंट, हळद, शेती औजारे, भाजीपाला, फुले, फळे यांचा समावेश आहे. वर्षाला आठ हजार कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात होते. मार्चपासून या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने ही निर्यात पूर्णपणे बंद होती. त्यानंतर ती काही प्रमाणात सुरू झाली आहे.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट

सध्या मालवाहतूक व इतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांना फारशी मागणी नाही. कारण या वाहनांच्या खपावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे असे सुटे भाग अजूनही गोडाऊनमध्ये पडून आहेत. या परिसरात दरमहा सत्तर हजार टन कास्टिंगची निर्मिती होते. त्यातून दरमहा ६०० ते ७०० कोटीची निर्यात होते. पण गेल्या तीन महिन्यापासून कच्चा माल कमी पडत आहे. हा माल मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून येतो. तेथे लॉकडाऊन कडक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आवक होण्यावर झाला आहे.

सुदैवाने सध्या ट्रॅक्टरला प्रचंड मागणी आहे. साधारणत: वर्षाला आठ लाख ट्रॅक्टरची निर्मिती होते. त्याला लागणारे नव्वद टक्के सुटे भाग कोल्हापुरात तयार होतात. मे आणि जूनमध्ये वीस हजारावर ट्रॅक्टरची विक्री झाली. पण आता कच्चा माल आणि परप्रांतीय कामगारांची कमतरता भासू लागल्याने संधी असूनही उत्पादनावर मर्यादा येत आहेत. परदेशातून हळूहळू मागणी येत आहे. पण त्याचा निर्यात खर्च वाढला आहे. इतर राज्यातील निर्यातीवरही परिणाम झाला आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील
फाउंड्री उद्योग सध्या अडचणीत आला आहे.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा

कुठे, काय निर्यात होते?
साखर : सौदी अरेबिया, चीन, बांग्ला देश, अफ्रिका
वाहनाचे सुटे भाग : रशिया, अमेरिका, इटली, जर्मनी, कोरिया, ब्राझिल
सूत, कापड : सौदी अरेबिया, रशिया, अफ्रिका, पाकिस्तान
मालवाहतूकीचे सुटे भाग निर्यात करण्यासाठी फारशी मागणी नाही. यामुळे सध्या ट्रॅक्टरचे जे सुटे भाग आहेत, त्यावर दक्षिण महाराष्ट्रातील फाउंड्री उद्योग तरला आहे. जिथे माल पाठवायचा तेथेच लॉकडाऊन कडक असल्याचा फटका या उद्योगाला बसत आहे.

सुमित चौगले, फाउंड्री उद्योजक

ट्रॅक्टरची वाढती मागणी आशेचा किरण

गेल्या वर्षी जून महिन्यात भारतात ७५,८५९ ट्रक्टरची विक्री झाली होती. यावर्षी म्हणजे जून २०२० मध्ये तब्बल ९२,८८८ ट्रॅक्टरची विक्री झाली. शेतीच्या कामात वाढलेला ट्रॅक्टरचा वापर, सरकारकडून मिळणारे अनुदान यामुळे त्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या ट्रक्टरसाठी लागणारे ९० टक्के सुटे भाग कोल्हापुरातच तयार होतात. दोन महिन्यात तब्बल साठ हजार ट्रक्टरला पुरतील एवढे सुटे भाग निर्यात झाले आहेत. यामुळे ट्रक्टरची ही वाढती मागणीच दक्षिण महाराष्ट्रातील फाऊंड्री उद्योगाला तारणार आहे.

अधिक वाचा  महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट!; छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत?

फाउंड्री उद्योगासाठी लागणारा कच्चा माल पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक येथून पुरवला जातो. लॉकडाऊनमुळे त्याचा पुरवठा कमी झाला आहे. याशिवाय या उद्योगात काम करणारे परप्रांतीय त्यांच्या राज्यात गेल्याने कामगारही नाहीत. या दोन्हीमुळे हा उद्योग अडचणीत आला आहे.

सचिन पाटील, फाउंड्री उद्योजक