डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतिपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

शंकरराव चव्हाण यांच्या १००व्या जयंती दिनानिमित्त सह्य़ाद्री अतिथिगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रूपांतर करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व होते. सुजलाम सुफलाम राज्यनिर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट

चव्हाणसाहेब कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरू करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावा यासाठी ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ गावपातळीपर्यंत पोहोचून त्यांचे विचार राज्याच्या तळागाळात जायला हवे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना स्व. शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. जायकवाडी, उजनीसारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे असल्याचे सांगितले.

चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जलसंवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम हाती घेतल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.